भुकेतून जन्मलेल्या नाटकाची गोष्ट -ख्येयेछीश?
Volume 6 | Issue 3 [July 2026]

भुकेतून जन्मलेल्या नाटकाची गोष्ट -ख्येयेछीश?
मेघना रॉय चौधरी

Volume 6 | Issue 3 [July 2026]

भाषांतर – मानव कांबळी

ह्या गोष्टीची सुरुवात २०२३ मध्ये झाली, जेव्हा जग कोवीड महामारी नंतर स्वतःला सावरत होते. आपल्या आयुष्याची पुन्हा सुरुवात करावी म्हणून मी मुंबईला जाण्याचा निर्णय घेतला. हा तसा एका रात्रीत घेतलेला निर्णय, कारण मुंबईच कदाचित असं शहर  असू शक्त जिथे बायकांना सुरक्षित वाटेल. शिवाय, नट म्हणून काम करणाऱ्यांना इतर कुठेही पैसे मिळतच नव्हते.  जे मिळत होते तेही कमीच. पण मला त्यामुळे विशेष फरक पडणार नव्हता कारण मी तिथे हे वास्तव बदलायलाच चालले होते. माझ्यात अजून आशावाद उरला होता.

मला एका प्रसिद्ध कंपनीत नाट्य समन्वयक म्हणून नोकरी लागली. हि कंपनी आपल्या कर्मचाऱ्यांना वेगवेगळ्या शाळांमध्ये नाटक शिकवायला पाठवत असे. मी अस्वस्थ व्हायचे कारण इथले अधिकतर कर्मचारी अप्रशिक्षित होते. तिथे मीच कदाचीत प्रशिक्षित नाट्य कलाकार होते. कंपनी मात्र नाटकाचा प्रत्यक्ष सराव न करता नाट्यकलेचा फायदा मात्र नक्कीच  घेत  होती, पण मला त्या नोकरीची गरज होती. माझ्या खात्यात फक्त ११००० रुपये होते. भौतिकशास्त्रात मास्टर्स करून मला एक वर्ष होऊन गेले होते, आणि नेट / सेट ची परीक्षा देऊन शैक्षणिक वर्तुळात परत प्रवेश करण्याचा मार्ग कठीण वाटत होता: त्या जगाशी माझा संपर्क बऱ्यापैकी तुटला होता.

पहाट झाली कि मी नाट्य-शिक्षिकेच्या भूमिकेत शिरायचे. स्वतःला सांगायचे कि मी नाटकाची परिवर्तनकारी शक्ती कोवळ्या मनांपर्यंत पोहचवते आहे. माझे काम सकाळी ८ ते संध्याकाळी ४, सोमवार ते शनिवार चालायचे, ज्यासाठी मला महिन्याचे १८००० रुपये असा पगार दिला जायचा. सुट्टी घेतल्यास हि रक्कम पण कमी व्हायचीच.

त्यात आला अस्तित्व टिकवून ठेवण्याचा हिशेब! ११५०० जायचे महिन्याच्या भाड्यात. २५०० रेंट-ओ-मोजो नावाच्या कंपनीला जायचे, कारण मी त्यांचाकडून एक डेस्क व खुर्ची भाड्याने  घेतली होती. ह्या गोष्टी घेण्यामागे ‘मी लेखिका आहे’ याची स्वतःला आठवण करून देणे, हाच हेतू. माझ्या आरे कॉलनीतल्या  फ्लॅटच्या खोलीत फर्निचर  म्हणजे ह्याच वस्तू होत्या. तो फ्लॅट मी अजून एका व्यक्तीसोबत शेयर करत होतेच. ४५३ ही रक्कम थर्ड व्हेव कॉफीची ‘व्हिएन्ना रोस्ट’ ची बॅग घेण्यात जायची, ती सुद्धा मेंबर्स डिस्काउंट नंतर. माझ्यासाठी घरात चांगली कॉफी असणे ही महत्वाची बाब. काही दिवस असे असायचे कि ‘स्वयंपाकघरात जाऊन चांगली कॉफी प्यायला मिळेल म्हणून उठावे’, ही  कल्पना मला प्रोत्साहन देणारी असे. ह्या खर्चानंतर माझ्याकडे फक्त ३५४७ रुपये  वाचायचे. एवढ्यात  पूर्ण महिना काढावा लागायचा. म्हणजे रिक्षाचे भाडे, बसचे भाडे, मेट्रोचे भाडे, सॅनिटरी नॅपकिन्स, सनस्क्रीन, आणि नाटकांची तिकिटं (नाटकं नियमित बघणं गरजेचं होतं, तोच माझा एकमेव अभ्यास) आणि हो, त्यात जेवणही असायचंच.

परंतु मी या काँक्रीटच्या जंगलात नाट्यकलेचा पाठपुरावा करायला आले होते म्हटल्या नंतर मला ते करणे भाग होते. मी एका नाटकात काय काय करता येईल हे शोधात होते. हे नाटक माझी राजकीय विचारसरणी, किव्वा नाट्यकलेच्या कल्पनांच्या  कुठेही जवळपास नव्हते. रिहर्सल ची खोली दिवसेंदिवस अव्यावसायिक होत गेली, पण मी राहिले. कारण इथेच मला अस्सल जेवण खायला मिळत असे: थोडा भात, भाजी, डाळ आणि कदाचित सर्वात महत्वाचे, सोबत जेवणारे अस्सल लोक.

जेवण हा चलनाचा प्रकार असू शकतो, हे कळायला मला बराच वेळ लागला.

मुंबईत राहून मला एक वर्ष झाले तेव्हा मी माझ्या पहिल्या नाटकावर काम करत होते – त्याचे नाव ‘दी अपॉलॉजी’. ह्या शहरात नाटक बसवण्याचे काम कसे चालते याची खास कल्पना नसल्यामुळे मी माझ्या नेमलेल्या प्रोड्युसरवर पूर्ण विश्वास ठेवून होते. चर्चा चालू असतांना मी सुचवले की प्रयोगाच्या मानधनाव्यतिरिक्त अभिनेत्यांना आपण प्रवास खर्चही द्यावा. पण प्रोड्युसरचा वेगळाच विचार होता.

तो म्हणाला, “त्यांना जेवण देऊया.”

ती कल्पना माझ्यासाठी नवलाईची होती. मी होकार दिला.

नाटकाची तालीम सुरु होऊन काही आठवडे गेले, आणि जेवणाचा दर्जा घसरत गेला. या गोष्टीचा मला अपेक्षेपलीकडे त्रास झाला. पैशा ऐवजी जेवण देण्याच्या प्रकारामुळे मी आधीच अस्वस्थ होते. नाट्यकलेत एरव्हीसुद्धा बलिदानाचे उदात्तीकरण केले जाते; आणि या बाबतीत मला तसे नक्कीच करायचे नव्हते. माझ्या अभिनेत्यांना व्यवस्थित पैसे मिळायला हवे होते, पण मला ते परवडणारे नव्हते. मी मात्र स्वयंपाक करू शकत होते. मग, चार-चार तासांच्या तालिमीनंतर मी किचनमध्ये प्रवेश करायचे. बाकी सगळे हळूहळू शामिल व्हायचे. त्यातला एक नट मुंबईत आपल्या परिवारासोबत राहत असल्यामुळे जेवण घेऊन यायचा. कुणी भाजी चिरे,  कुणी डाळ ढवळे,  तर कुणी भांडी घासत असे. आम्ही सारे एकत्र जेवल्यानंतरच घरी जायचो. मला माहित होते की हे जेवण पैशाची जागा घेऊ शकत नव्हते, पण याने प्रदीर्घ चालणारी तालीम सुसह्य व्हावी अशी केवळ एकमात्र इच्छा होती.

पत्रकार अनेकदा तुम्ही दिवसभरात काय खाता’ असा  प्रश्न अभिनेत्यांना विचारत. तो  प्रश्न ऐकून आपण एक यशस्वी कलाकार असून आपल्याला जर हा प्रश्न टोक-शो मध्ये विचारला तर “वडा पाव, वडा पाव आणि कॉफी” असे उत्तर असले असते.

आणि मग माझा फोन वाजे.

तिथून माझी आई एक प्रश्न विचारायची: “ख्येयेछीश?”  (जेवलीस?)

“हो आई, मटण-भात खाल्ला.”

परत एक वर्ष मागे जाऊया – जेव्हा मी ते भयानक नाटक करत होतें, भयानक, कारण त्याबरोबर एक वेळचे फुकट जेवण, आणि सोबतीला लोक असत. दिवसभरातले तेच एकमेव जेवण होते, जे मी एकटीने खात नव्हते.

एक दिवस तालीम कॅन्सल झाली. म्हणजे त्या रात्री फुकटचे जेवण नाही.

माझ्या खात्यात जेमतेम २०० रुपये पण नव्हते. असे दिवस आले की मी भूक सहन करावी लागू नये म्हणून लवकर झोपायला जायचे. पण त्या संध्याकाळी मला अनेक दिवसांनंतर माझ्या छानश्या डेस्कसमोर बसायची संधी मिळाली होती. मी मॅगी बनवली – मला हेच परवडणारं होतं. खाताखाता मी लॅपटॉप उघडून बेर्टोल्ड ब्रेष्ट वाचू लागले. मी कट्टर बंगाली आहे अशी कल्पना करू नका – त्या दिवशी ब्रेष्टची १२५वी जयंती होती, आणि मला वाटलं की त्याच्या कामाचा परत परिचय करून घ्यावा.

त्याऐवजी, माझा परिचय झाला तो भुकेशी.

ज्यांच्या कडे काही नाही असे आपण
जर पोहोचलो नाही अन्नापर्यंत
तर ते समजतील  आपल्याला गरज नाही
पण जर आपण पोहोचलो त्या अन्नापर्यंत
आणि नाही घेऊ शकलो ते विकत
तर त्यांना आपले वास्तव कळेल

मी ओक्साबोक्शी रडू लागले.

त्या कवितेने मला वारशात मिळालेल्या भुकेच्या सगळ्या गोष्टी आठवू लागल्या. बंगालच्या दुष्काळाच्या गोष्टी, दारोदार जाऊन ‘फेना’ (पेज) मागणाऱ्या लोकांच्या गोष्टी. बंगाली पाककृतीत खसखशीचा वापर कसा सुरु झाला (सहजपणे खायला अनेक प्रकारांचे साहित्य न मिळाल्या मुळे) त्याच्या गोष्टी. फाळणीच्या वेळी बांगलादेशातून माझं कुटुंब स्थलांतरित झाल्याच्या गोष्टी. बाबा काम करत असलेली आयटी कंपनी बंद पडल्यावर माझ्या पालकांनी माझ्यासाठी दूध विकत घ्यायला पैसे उसने घेतल्याच्या गोष्टी.

या सगळ्याच्या तुलनेत माझी भूक कुठेतरी बोगस वाटू लागली.

त्यांचे स्थलांतर त्यांनी नव्हे, तर परिस्थितीने घडवून आणले होते. त्यांच्या या उपासमारित उपासमारीच्या त्यांचा काही हात नव्हता. पण माझ्या भुकेमागे माझेच निर्णय होते.

पण मग माझी भूक काय खरी नव्हती?

असे विचार चालू असतानाच माझा फोन वाजला.

“माँ.”

“ख्येयेछीश?” (जेवलीस?)

मला आठवतय, त्या अर्धवट-खाल्लेल्या मॅगीच्या वाटीकडे बघून माझ्या डोक्यात एकच विचार आला: फेना-भात आणि पोषतो (खसखस) खाण्यासाठी मी काहीही केलं असतं.

पण मी खोटं बोलले.

“हो माँ, मी जेवले. थोडी कामात आहे.”

काही मिनिटांनी तिने माझ्या खात्यात १००० रुपये पाठवले. कदाचित तिच्यातल्या माउलीने माझ्या आवाजातली भूक ओळखली असावी. किव्वा तिच्यातल्या केटररने? बाबांच्या निवृत्तीनंतर आईने बंगाली जेवण पुरवण्याचा – केटरिंगचा – धंदा सुरु केला होता. जगण्यासाठी ती लोकांना खायला घालत होती.

मी ते पैसे झटकन उडवले नाही. नंतर कधी तालीम कॅन्सल झाली तर ते कामी येणार होते.

“माझी भूक नक्की खरी आहे का?”

हा प्रश्न माझ्या डोक्यातुन जाईना.

सध्या ‘ख्येयेछीश?’ हे ९० मिनिटांचे नाटक आहे ज्यात प्रत्यक्ष स्वयंपाक केला जातो. पण याची सुरुवात नाटक म्हणून नव्हे तर त्या एका प्रश्नापासून सुरु झाली.

मी माझ्या सहकाऱ्यांशी या भुकेच्या विषयावर चर्चा करू लागले. त्यात अनेक गोष्टी आढळल्या: रूम चे भाडे द्यायला न खाल्लेली जेवणं, आई-वडलांना दिलेली खोटी कारणे, स्टीलच्या डब्यांमध्ये  एका शहरापासून दुसऱ्या शहरापर्यंत प्रवास करणारे विविध पदार्थ, तालीमीनंतर रात्री खाल्लेले जेवण, आणि तालीम कॅन्सल झाल्यावर कॅन्सल झालेले जेवण. काही व्यावसायिक नाट्यप्रयोगांमध्ये मुख्य आणि अन्य कलाकारांना वेगवेगळे जेवण दिले जात असे, हे मला कळले. आम्ही कसे परत घरी गेल्यावरच डॉक्टर कडे जायचो ह्याबद्दल बोललो, कारण पालक आमच्या जेवणाचे व इलाजाचे खर्च सांभाळायचे. ‘आपण घेतलेला निर्णय बरोबर आहे का?’ असा संशय यायचाच, पण ह्याची चर्चा आम्ही परिवारासमोर क्वचितच केली असेल – कारण हा निर्णय घेण्यासाठी आम्ही आधीच बरेच काही सोसलं होतं. हा होता भारतमुनींचा शाप, आणि आम्ही तो भोगत होतो.

अर्थात, हा मार्ग निवडता येणे हीच विशेष सवलत. जी भूक आम्ही फाळणीच्या, दुष्काळाच्या किव्वा विस्थापनाच्या गोष्टींमधून वारशाने मिळवली होती, ती आमच्या निवडलेल्या भुकेपेक्षा फार वेगळी होती. पण ती भूक तेव्हढीच खरिही होती. या संवादांच्या ओघात कुठेतरी मला उमगू लागले की अन्न हे नाट्यकलेच्या विश्वाला समजण्याचे साधनही होतं. त्यातून त्या विश्वाची उतरंड, अर्थव्यवस्था, काळजी घेण्याची क्षमता आणि विसंगतीही दिसून यायची.

अशा प्रकारे, नवीन नाटक निर्माण झाले.

नाटकाच्या पहिल्या प्रयोगाची तारिख जवळ येत होती, आणि मी बरीच अस्वस्थ होत होते. माझी टीम (धनेश, सिद्धेश, उत्कर्ष व सागर) मला बरेच अभिप्राय देऊन नाटक पुढे नेत होती तरी हे नाटक जास्तच आत्ममग्न आहे असं मला सतत वाटत होते.

अत्ता आम्ही ‘ख्येयेछीश?’ विविध मंचांवर, आणि वेगवेगळ्या लोकांसमोर सादर केले आहे. पण प्रयोग संपल्यावर होणाऱ्या गोष्टी मला जास्त लक्षात राहतात. लोक थांबतात. जेवतात. आणि आम्हाला त्यांच्या भुकेच्या गोष्टी सांगतात. दर प्रयोगानंतर आम्ही नवीन, व आधीपेक्षा अधिक जास्त गोष्टी सोबत नेतो. मला या गोष्टींचे काय करावे असा प्रश्न पडतो, कारण त्या सगळ्याच अप्रतिम आहेत. पण सध्या, मी इथे आहे, आणि आमचा हा प्रयोग नवीन गोष्टी निर्माण करत चाललाय.

माझ्या आई-वडिलांनी नाटक पाहिलं आणि आमच्यातलं अंतर  मिटून गेलं.

ते मला नवाजुद्दीन सिद्दीकीचे व्हिडिओ पाठवू लागले – त्यात तो आपल्या संघर्षांचे वर्णन करतो. ते कदाचित असा विचार करतात की जर तो सिस्टिम ला मात देऊ शकतो, तर मेहनत केल्यास मी ही यश मिळवू शकते. हल्ली माझी आई एवढे जेवण बनवते कि मला ते कधीच संपवता येत नाही. तिची कल्पना अशी कि पोट भरलं तर  माणूस कोणतीही समस्या सोडवू शकतो. मी निघतांना ते सगळे रिकामे स्टीलचे डबे मला खचखचून भरून न्यायला सांगतात, पण एका अटीवर: मी सगळे डबे परत येतांना घेऊन यावे.

आजही माझी आई मला दिवसातून तीन वेळा तोच प्रश्न विचारते: ‘ख्येयेछीश?’

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

oneating-border
Scroll to Top
  • The views expressed through this site are those of the individual authors writing in their individual capacities only and not those of the owners and/or editors of this website. All liability with respect to actions taken or not taken based on the contents of this site are hereby expressly disclaimed. The content on this posting is provided “as is”; no representations are made that the content is error-free.

    The visitor/reader/contributor of this website acknowledges and agrees that when he/she reads or posts content on this website or views content provided by others, they are doing so at their own discretion and risk, including any reliance on the accuracy or completeness of that content. The visitor/contributor further acknowledges and agrees that the views expressed by them in their content do not necessarily reflect the views of oneating.in, and we do not support or endorse any user content. The visitor/contributor acknowledges that oneating.in has no obligation to pre-screen, monitor, review, or edit any content posted by the visitor/contributor and other users of this Site.

    No content/artwork/image used in this site may be reproduced in any form without obtaining explicit prior permission from the owners of oneating.in.