प्रवास, अंधार आणि कोळशाचा धूर
Volume 4 | Issue 8 [December 2024]

प्रवास, अंधार आणि कोळशाचा धूर : १९७०च्या दशकात झरिआ कोळसा-खाणींमध्ये मिळणारं अन्न
—रोहित मनचंदा

Volume 4 | Issue 8 [December 2024]

चित्र – अभिषेक झा

मी पवईत राहतो. मुंबईच्या एका टोकावर असणारा हा भाग आता शहरातील खवय्यांचं एक केंद्र झाला आहे. मी राहतो त्या भागापासून पाचेक किलोमीटरच्या पट्ट्यात पन्नासहून अधिक रेस्टॉरन्ट आहेत. या उपहारगृहांमध्ये एशियन, साउथ एशियन, ‘कॉन्टिनेन्टल’, नॉर्थ अमेरिकन आणि साउथ अमेरिकन अशा वैविध्यपूर्ण खाद्यपरंपरांचे पदार्थ मिळतात. शिवाय, झोमॅटोसारख्या मध्यस्थांच्या माध्यमातून घरपोच खाद्यपदार्थ पुरवणारी ठिकाणंही आहेत. या सगळ्याचा परिणाम असा होतो की, माझ्या बायकोला किंवा मला ‘बाहेरचं कायतरी खाऊया’ असं वाटतं तेव्हा समोर पर्यायांची अतिरेकी रीघ असते, त्यामुळे गोंधळात पडायला होतं. आजचं पवई उपनगर १९९०च्या दशकारंभीच्या पवईपासून ओळखताही येणार नाही इतकं वेगळं रूप धारण करून आहे. पूर्वी इथे जेमतेम पाच-सहा रेस्टॉरन्ट होती- तिथे केवळ ‘देशी’ पदार्थ मिळायचे, झोमॅटो किंवा स्विगी अशा पोचवणीची सेवा देणाऱ्या कंपन्या नव्हत्या, त्यामुळे जीवघेण्या वेगात सूं-सूं करत जाणाऱ्या त्यांच्या दुचाकीही नसायच्या.

हे सगळं आज काहीसं वास्तवातीत असल्यासारखं वाटतं. माझ्या बालपणी १९७०च्या दशकाच्या मध्यात पाहिलेला झारखंडमधील (तेव्हाच्या दक्षिण बिहारमधील) झरिआ कोळसाखाणींचा अवकाश आठवला की आजच्या पवईतलं हे वातावरण आणखीच अवास्तव वाटू लागतं. झरिआमध्ये जवळपासच्या परिसरात केवळ दोन उपहारगृहं होती. ‘जवळपास’ हा शब्द इथे वापरणं चुकीचं होईल, कारण पवईत पाच किलोमीटरांची त्रिज्या धरली तर त्या भागात पन्नासेक रेस्टॉरन्ट सापडतात, तर झरिआमध्ये एक उपहारगृह आमच्या घरापासून सोळा किलोमीटर अंतरावर होतं आणि दुसरं (गुगल मॅपच्या म्हणण्यानुसार) चौतीस किलोमीटर दूर होतं- म्हणजे साधारणपणे मुंबईच्या पूर्ण लांबीइतकं हे अंतर होतं.

मी सुरुवातीलाच रेस्टॉरन्ट किंवा उपहारगृहं, त्यांचं वैपुल्य नि त्यांचा अभाव याबद्दल बोललो, कारण एखादा पदार्थ चाखून बघायची कल्पना मनात आली की तो पदार्थ कुठे सगळ्यांत चांगला मिळतो त्या रेस्टॉरन्टमध्ये जायचं, ही आधुनिक शहरी जीवनातली जवळपास प्रतिक्षिप्त क्रिया झाली आहे. पण मी म्हणतोय त्या कोळसाखाणीच्या प्रदेशात आणि त्या काळात उपहारगृहं तुरळक होती, तेव्हा आपल्या घरच्या जेवणाहून वेगळी- त्या प्रदेशातल्या अन्नाची चव कशी चाखली जात होती. उदाहरणार्थ, आम्ही तेव्हा बिहारमध्ये राहत होतो तर तिथले अन्नपदार्थ आमच्यापर्यंत कसे पोचत होते? (माझं कुटुंब पंजाबहून तिथे ‘स्थलांतरित’ झालं होतं. यात तशी फार काही गुंतागुंत नाही. आम्ही इतर लोकांच्या घरी जाऊ तेव्हाच आम्हाला असं स्थानिक अन्न चाखायला मिळायचं. त्यामुळे कोणताही विशिष्ट खाद्यपदार्थ नशिबाता येण्याकरता बरीच वाट बघावी लागायची- काही वेळा संयमाची पराकाष्ठा करावी लागायची- मग कोणी जेवायचं बोलावणं पाठवलं, किंवा लग्नाचं किंवा एखाद्या सणाचं निमंत्रण आलं, की मग तिथे वेगवेगळे स्थानिक खाद्यपदार्थ खायला मिळत.

शिवाय, झरिआतली उपहारगृहं किंवा इतर लोकांची घरं, याबाबतीत मोजके अपवाद सोडले तर फारसं काही सुखावह वातावरण नसायचं. अमलाबाद या छोट्या कोळसाखाणीसाठी उभारलेल्या वसाहतीत माझं लहानपण गेलं. दामोदर नदीच्या खोऱ्यात एका काठावर वसलेल्या अमलाबादच्या जवळपास दुसरं कुठलंच शहर वा मोठं गाव नव्हतं. त्या अर्थी आम्ही अगदी ‘दुर्गम’ भागात राहात होतो. आमच्या माहितीतल्या कोणाच्या घरी जायचं तर चार टप्प्यांमध्ये प्रवास करावा लागायचा- आधी जीपमधून दामोदरच्या काठावर जावं लागायचं, मग तिथून रो-बोटमधून नदी पार करावी लागायची (तेव्हा तिथे पूल नव्हता), मग खोऱ्याच्या दुसऱ्या बाजूला असलेला चढ चढून जावं लागायचं, तिथे एक गॅरेज होतं- त्यात आमची खिळखिळी झालेली फियाट होती. मग आम्ही फियाटमधून पुढील प्रवास करायचो- आधी धुळीने माखलेल्या वाटेवरून काही किलोमीटर पार केल्यावर जवळचा डांबरी रस्ता लागायचा, त्यावरून पुन्हा आणखी जे काही असतील तितके किलोमीटर पार करून आम्ही आम्हाला निमंत्रित केलेल्यांच्या घरी पोचायचो. ‘बाबा रे, सगळ्यासाठी किती तो प्रवास करावा लागायचा,’ असं माझी आई म्हणत असे. हे ती तिच्या आसपास असेल्यांना उद्देशून नव्हे तर देवाला उद्देशून म्हणायची. ‘यांना कोळसा नदीच्या कडेला आमच्याच बाजूला सापडायचा होता! अन् तोही एकाच ठिकाणी!’

दुर्गम भागात असणारं अमलाबाद, तिथले लोक हे सगळं बंदिस्त नि संकुचित वृत्तीचं असेल, जुनाट चालिरीतींमध्ये बुजलेलं असेल, असं कोणाला वाटू शकतं. पण मी आठवून पाहतो तेव्हा याच्या विरोधी चित्र डोळ्यांसमोर उभं राहतं नि मलाच आश्चर्य वाटतं- या कोळसाखाणींच्या वसाहती पूर्णपणे वैश्विक वृत्तीच्या, अनेक मिश्र लोकसमूहांना सामावणाऱ्या होत्या. देशाच्या वेगवेगळ्या भागांमधून आलेले लोक तिथे होते. कोळसाखाणीसाठी लागणाऱ्या विविध कामांच्या निमित्ताने तिथे आलेल्या या लोकांमुळे हा मुलूख सांस्कृतिक संमिश्रतेचा नमुना ठरला होता.

त्यामुळे वर नोंदवलंय तसा प्रवास करत मग मला गुजराती, मारवाडी, मराठी, काश्मिरी आणि ‘मद्रासी’ खाद्यपदार्थ चाखायला मिळत. (साचेबद्ध शब्दप्रयोगांच्या काळात विंध्य पर्वतरांगांच्या दक्षिणेला असणाऱ्या प्रांतांमधील सर्वच अन्नपदार्थांकरता ‘मद्रासी’ हे संबोधन वापरलं जायचं). याशिवाय, अर्थातच आम्ही आपलंसं केलेल्या बिहार राज्यातील स्थानिक खाद्यही अशा मेजवान्यांवेळी उपलब्ध व्हायचं. ‘लिट्टी-चोखा’ आणि ‘सत्तू की रोटी’ हे या राज्यात नियमित जेवणाचा भाग असणारे आणि अभिमानाने समोर मांडले जाणारे पदार्थ. त्यातील घटक आणि पदार्थ तयार करण्याची पद्धत दोन्ही वैशिष्ट्यपूर्ण होतं. मी सुरुवातीपासूनच या दोन्ही पदार्थांच्या प्रेमात पडलो. ‘लिट्टी-चोखा’मध्ये विविध घटकांचा मुबलक वापर केला जातो आणि त्यासोबत बरेच प्रयोगही करून पाहतात येतात त्यामुळे त्यात विलोभनीय वैविध्य पाहायला मिळतं (त्या-त्या ठिकाणच्या डाळींचा वापर करून केलेली आमटी आणि त्यावरची फोडणी, यांबाबत प्रयोग करता येतात तसंच लिट्टी-चोखाच्या बाबतीत असतं).  आमच्या परिचयातली सुमारे डझनभर बिहारी कुटुंबं होती आणि त्यांच्याकडून आम्हाला अधूनमधून जेवणासाठी बोलावणं असायचं. प्रत्येक कुटुंबाची लिट्टी-चोखा तयार करण्याची स्वतःची पद्धत होती. कोणी लिट्टीमध्ये सत्तूचं प्रमाण जास्त ठेवायचं, कोणी कमी ठेवायचं (आणि खुद्द सत्तूची पाककृतीही बरीच वेगवेगळी असायची). कोणी लिट्टीचं पीठ वरवर परतून घ्यायचं, कोणी ते भाजून घ्यायचं, तर कोणी भट्टीत जास्तीचं भाजून घेत असे. कोणी चोखामध्ये टॉमेटो जास्त घालायचं, तर कोणी वांगं किंवा बटाटा जास्त घालायचं. शिवाय, लिट्टी आणि चोखामध्ये थोडं मोहरीचं तेल टाकलं जायचं आणि शेवटी गरम तुपाची धार त्यावर सोडली जात असे. एकंदरित, हिवाळ्यात दुपारचं जेवण असेल, प्रसन्न वातावरण असेल, तर योग्य प्रमाणात सर्व घटक घालून तयार झालेला हा पदार्थ खाण्यात असेल तर, त्या वातावरणाला किंवा तुमच्या पोटाला इतकं पोषक ठरणारं दुसरं काहीच नाही!

मला सत्तूची चव विशेष पसंत पडली होती, त्यामुळे सत्तू की रोटीची मला विशेष ओढ वाटत असे. मी चौदा वर्षांचा असताना आम्ही एका बिहारी कुटुंबाच्या शेजारी राहायला गेलो, तेव्हा या सुंदर पदार्थासोबतच आणखी एका सौंदर्याची मला भुरळ पडली. आमच्या या शेजाऱ्यांची एक मुलगी होती (तिला आत्तापुरतं अलका असं म्हणू). तिचा सुंदर चेहरा आणि एकंदर बांधा कोणाचीही नजर वेधून घेईल असा होता, यावर साधारणपणे सर्वांचंच एकमत होतं. शेजारधर्मानुसार एकमेकांकडे खाद्यपदार्थांची देवाणघेवाण सुरू झाली: त्यांच्या घरी खास पंजाबी पदार्थ जाऊ लागले, आमच्याकडे बिहारी रुचकर पदार्थांची आवक सुरू झाली. शिवाय, त्यात माझ्या बाजूने भर म्हणजे अलकाशी आपण काहीतरी प्रेमळ लगट करत असल्याची कल्पना रंगवता येत असे. पण लवकरच माझ्या या कल्पनांचा चक्काचूर झाला. एकदा मुलग्यांच्या टोळक्याने स्कूल-बसमध्ये मुली बसायच्या त्या सिटांवर खाजखुजलीची पूड टाकायची योजना आखली. विशेषतः जास्त सुंदर असलेल्या मुलीच्या सीटवर आणखीच उत्साहाने पूड टाकण्यात आली. ही अर्थातच अगदी सपशेल निंदनीय अशी क्रूर मस्करी होती. त्या विशिष्ट वेळेच्या नि ठिकाणाच्या संदर्भातच त्याचा काहीएक अंदाज येऊ शकेल. आम्ही केलेल्या या खटाटोपामुळे मुलींच्या पायांना खाज सुटली आणि ते लालेलाल झाले. याचा परिणाम म्हणून अलकाच्या आईने आम्हाला बोलावून आमची चांगली खरडपट्टी काढली. त्यांच्या घराच्या कट्ट्यावर ती उंच पुतळ्यासारखी उभी होती आणि समोर रेतीवर आम्ही आठ मुलगे मान खाली करून तासभर उभे होतो. अलकाच्या आईची जळजळीत नजर आणि तिच्या जिभेचे फटकारे आमच्यावर पडत होते. (“हे असं कोणी तुमच्या आयांशी वागलं तर तुम्हाला चालेल का? मी तसं करू?”) आमच्या घरच्यांकडूनही ओरडा खावा लागेल, या भारापोटीही आमच्या माना आणखी खाली गेल्या. अलकाशी काहीएक प्रेमसंबंध प्रस्थापित करण्यासाठी पहिलं पाऊल म्हणून तिचं माझ्याबद्दल किमान चांगलं मत होणं गरजेचं होतं, पण या प्रसंगाने अशी संधी निर्माण होण्याची शक्यताही धुळीस मिळाली. या विचाराने मला आणखीच खच्ची झाल्यासारखं वाटलं. यासोबत मला निराश वाटण्यामागे आणखीही कारण होतं- आता त्यांच्या घरून आमच्याकडे पुन्हा कधी सत्तू की रोटी येणार नाही, याबद्दलही माझी खात्री पटली. पण माझ्या ही आत्यंतिक निराशा फोल ठरवत नंतरच्या काळातही आमच्याकडे शेजाऱ्यांकडून सत्तू की रोटी आणि सत्तू-आम-पन्ना सरबत येत राहिलं. हे सरबतसुद्धा बिहार आणि उत्तर प्रदेशाच्या पूर्व भागांमध्ये विशेष प्रिय आहे. कैरी, सत्तू आणि इतर चवीचे घटक घालून तयार केलेलं हे सरबत भाजून काढणाऱ्या उन्हाळ्यात चांगला उतारा ठरतं. एकदा का दोनदा तर खुद्द अलकाच हे पदार्थ घेऊन आमच्या घरी देऊन गेली आणि मी बावळटासारखा तिच्याकडे पाहत राहिलो. उदार अंतःकरणाच्या आणि विशाल दृष्टीच्या स्त्रियांचा दयाळूपणा अमर्याद असतो, हेच खरं! त्यांच्या या विलक्षण गुणाचा मला आलेला हा पहिलावहिला अनुभव. थोडं विषयांतर करतो : अन्नपदार्थ आणि सुंदर मुलगी यांचा संबंध असणारा आणखी एक असाच फजितीचा प्रसंग मी ओढवून घेतला होता. या प्रसंगात युरोपीय खाद्यपदार्थ आणि पोलिश सुंदरीचा समावेश होता. कोळशाच्या खाणींमध्ये फ्रान्स, पोलंड, सोव्हिएत रशिया इत्यादी परदेशांमधून ‘तज्ज्ञ’ सतत येत असत, त्यामुळे तिथे त्यांचे खाद्यपदार्थ उपलब्ध होत. या दुसऱ्या प्रसंगातही स्त्रियांच्या उपकारक दयाभावामुळेच माझी पापातून सुटका झाली. पण जागेअभावी आणि वाचकांच्या संयमाची आणखी परीक्षा घ्यायला नको म्हणून मी तो प्रसंग इथे सविस्तर नोंदवत नाही.

झरिआ खाणींचा परिसर पश्चिम बंगालला अगदी लागून होता, त्यामुळेही तिथे विशेष चवदार पदार्थांची रेलचेल होती. धनबादहून केवळ तीस किलोमीटरांवर बिहार-बंगाल यांची हद्द होती, आणि खाणपरिसरात बंगाली लोक मोठ्या संख्येने होते. एका बंगाली घरामध्ये आम्हाला भोजनसमारंभासाठी बोलावण्यात आलं तेव्हा तिथे ‘शोर्शे माच्छ’ (फोडणी घातलेल्या मसाल्यातला मासा), ‘आलू पोस्तो’ (खसखसचं आवरण असलेला बटाट्याचा गर) या असामान्य बंगाली पदार्थांची चव अनुभवायला मिळेल, अशी अपेक्षा माझ्या मनात निर्माण झाली. या पदार्थांचे उच्चारही तोंडाला पाणी सुटतील असे रसमय होते, त्यामुळे मी मुद्दाम त्यांची नावं इथे लिहिली आहेत. शिवाय, कोबी किंवा शेंगा किंवा पडवळ अशा कशाचीतरी भाजीही तितकीच भुरळ घालणारी असायची. फक्त या भाज्याही बंगाली घरात वेगळ्या तऱ्हेने मिळत- त्यांच्या अशा भाज्यांमध्येही कधी माशांची डोकी मुघलाई पद्धतीने पेरलेली असत. ही चमत्कारिक पद्धत आजही मला अचंबित करते आणि तितकीच मोहकही वाटते. माशाशिवाय त्यांना कोणत्याच पदार्थाची कल्पना करवत नाही का, असा प्रश्न आमच्या मनात येत असे.

केवळ मत्स्याहार आणि शाकाहारच मोहून टाकणारा होता असं नाही. बंगाली घरांमध्ये आम्हाला एका वेगळ्याच प्रकारच्या तांदळांचा भात खायला मिळत असे. तांदळाचा हा प्रकार सर्वसाधारणपणे फारसा परिचित नव्हता, पण शोर्शे माच्छ किंवा मच्छेर झोल या सोबत वाढलेल्या पदार्थांशी चवीच्या बाबतीत स्पर्धा करू शकेल असा त्यांच्याकडचा भात असायचा. थोड्याच दिवसांमध्ये माझे आईवडील या भाताच्या प्रेमात पडले. हा तांदूळ बंगालमधूनच तिथे येत होता. बासमतीला उच्चस्थान दिलं जात असलं तरी या बंगालहून येणाऱ्या तांदळाचा भात आमच्या मते वास व चव या दोन्ही बाबतीत बासमतीवर मात करेल असा होता. या तांदळाचं नाव गोबिंदभोग (किंवा ‘गोबिंदोभोग’) असं होतं. भगवान कृष्णापुढे प्रसाद म्हणून ठेवण्याजोगा पदार्थ म्हणून त्याला हे नाव पडलं. पण त्याचसोबत त्यातील ‘भोग’ हा शब्द मानवाच्या चवीवर होणाऱ्या त्या भाताच्या परिणामाशीही जुळणारा होता. फिश किंवा मटण करीसोबत भात खायचा असेल तर या तांदळाला तोड नव्हती. त्या तुलनेत कमी प्रतीच्या मानल्या जाणाऱ्या चिकन करीसोबत हा भात खाणं मात्र व्यर्ज्य मानलं जात होतं. माझे आईवडील गोबिंदोभोग तांदळाच्या इतके प्रेमात पडले की, माझ्या वडिलांची ओडिशा किंवा मध्य प्रदेश इथल्या इतर खाणींमध्ये बदली झाली आणि कालांतराने ते निवृत्त होऊन दिल्लीला स्थायिक झाले तरीही, माझे आईवडील काहीतरी करून एखाद्-दोन किलो गोबिंदोभोग तांदूळ मिळवायचेच. कधी मित्रमंडळींपैकी कोणी किंवा कधी कोणी सहकारी त्या ठिकाणावरून दिल्लीला येणार असेल तर माझे आईवडील त्यांना संपर्क करून हा तांदूळ आणायची विनंती करत. हा गोबिंदोभोग तांदळाचा प्रचार सुरू आहे, असं कोणाला वाटत असेल तर, होय, हा प्रचारच आहे, असं मी बेधडकपणे मान्य करायला तयार आहे. तुम्ही स्वतः या तांदळाच्या भाताची चव घेतलीत की तुम्हालाही त्याची भुरळ पडेल. आता तांदळाचा हा प्रकार तुलनेने अधिक सहजपणे मिळत असावा. अनेकदा फेसबुकवरील जाहिरातींमध्ये हा तांदूळ दिसतो.

अंधारातून प्रवास

घरातील अन्न कितीही सुखावह असलं तरी बाहेर खाण्याचं आकर्षण अवर्णनीय असतं. जागाबदलामुळे जाणवणारा ताजेपणा, हा एक भाग झाला. पण त्याशिवाय, सुरुवातीपासून शेवटपर्यंत कोणीतरी आपल्याला खाण्याचे पदार्थ आणून देतंय नि आपल्याला फक्त घास उचलण्यापुरती बोटं हलवावी लागतायंत, हा निव्वळ लाड पुरवून घेण्याचा भागही त्यात विशेष महत्त्वाचा ठरत असावा. (आदरातिथ्याच्या या संकल्पनेमुळेच किमान भारतीय उपखंडात तरी घरी आलेल्या पाहुण्यांना स्वयंपाकामध्ये किंवा जेवण वाढण्यात किंवा नंतरच्या भांडी धुण्याच्या कामात अगदी किंचितही मदत करू दिली जात नाही की काय, अशी शंका मला अनेकदा पडते. अतिथी देवो भव, या उक्तीमध्येही असं पाहुण्यांना उच्चासनावर ठेवणं अभिप्रेत आहे).

मूळ मुद्द्याकडे परत येतो : मी आधी नमूद केल्याप्रमाणे, झरिआला असताना आम्हाला स्वतःचे अशा प्रकारे लाड पुरवून घ्यायचे असले तर दोन पर्याय होते. आम्ही राहत होतो तिथून जवळच धनबाद शहर होतं- तिथे व्हेजिस या नावाचं एक मद्रासी उपहारगृह होतं (माझ्या समजुतीनुसार ते मुळात उडुपी लोकांचं असावं). तिथे मला उत्कृष्ट उत्तप्पा कसा असतो ते पहिल्यांदा चाखायला मिळालं. धनबादच्या दुसऱ्या टोकाला, सुमारे ३५ किलोमीटर दूर, ग्रॅन्ड ट्रन्क रोडवर दुसरा पर्याय होता- या भागात एका उद्यमशील शीख माणसाने एका धाबा सुरू केला होता. बाहेरचं खाण्यासाठी आम्ही इतकं अंतर पार करून तिकडे जायचो; त्यात तिथले रस्ते म्हणजे बहुतांश वेळा रस्ते नसायचेच, त्या निव्वळ झाडंझुडपं साफ करून तयार झालेल्या मातीच्या खडबडीत वाटा होत्या; आणि अशा खडबडीत वाटांवरचा प्रवास कशासाठी तर, आम्ही मूळचे ज्या राज्यातले होतो तिथलं अन्न खायला मिळावं म्हणून! पंजाबी धाब्यात काय-काय मेजवानी असायची त्याबद्दल फारसं बोलायची गरज नाही- कोणत्याही धाब्यात तुम्हाला हे पदार्थ चाखायला मिळतात. तंदूरी चिकन, शीख कबाब; तंदूरी नान, काली दाल… हे पदार्थ आता इतके सर्रास उपलब्ध होतात की या पदार्थांचा आता पूर्वीसारखी काही रूबाब उरलेला नाही, किंबहुना ते आता निरर्थक शब्द ठरले आहेत. पण या जागेची दोन वैशिष्ट्यं माझ्या आठवणीत पक्की बसलेली आहेत. पहिलं वैशिष्ट्य तिथल्या वातावरणाशी संबंधित होतं. या धाब्यावर गेल्यानंतर तिथल्या खास पारंपरिक खाटेवर मांडी घालून बसावं लागायचं. वर मोकळं आकाश असायचं आणि त्यातल्या चांदण्यांकडे बघताना अधेमधे फक्त झाडांच्या फांद्या यायच्या. सत्तरच्या दशकात प्रकाशाचं आणि हवेचं प्रदूषण फारसं नसल्यामुळे चांदण्यांचा पसारा अधिक सहजपणे दिसत असे. या जागेचं दुसरं वैशिष्ट्य आवाजांशी संबंधित होतं. जवळच्या शेतांमधून कोल्हेकुई कानावर पडत असे. कोल्ह्यांचा आवाज जवळून ऐकलेल्या कोणालाही मी काय म्हणतोय ते कळेल. या आवाजात समोरचे पदार्थ खाताना मृत्यूविषयीची सूचनाच आपल्यापर्यंत पोचतेय, असं वाटत असे. सुदैवाने कोल्हेकुईमुळे निर्माण झालेल्या खिन्नतेवर माझ्या वडिलांचा एक मित्र पुरेसा उतारा देत होता. त्याची विनोदबुद्धी अतिशय तल्लख होती आणि कान विटतील अशा पातळीवरची भाषा तो वापरत होता. त्यामुळे जेवायला एकत्र जमलेले इतर पुरुष एकीकडे बावचळले होते, तर तितकीच त्यांना या सगळ्याची मजाही येत होती. स्त्रियांना यावर चिडल्यासारखं दाखवण्यावाचून दुसरं काही करता येण्यासारखं नव्हतं. त्या माणसाच्या जिभेला काही हाड कसं नाही, इत्यादी शिव्याशाप देऊन त्या थांबत होत्या. मुलांना या सगळ्या थट्टामस्करीमुळे हसून-हसून उचक्या लागत होत्या.

या सर्वांहून वरचढ ठरेल असा अंधार तिथे पसरलेला असायचा. धाब्यावर आम्ही कायम रात्रीचंच जेवायला जात असू. सतत वीजपुरवठा बंद होत असायचा, त्यामुळे बहुतेकदा आमचं हे जेवण कंदिलाच्या प्रकाशात व्हायचं. आजूबाजूला चतूर आणि डास घोंघावत असताना, आकाशात चांदण्यांचा खच पडलेला असताना कंदिलाच्या प्रकाशात समोरचे पदार्थ चाखायचे, हा प्रकारबाहेर खायला गेल्यावर व्हायचा तसंच घरातही अनेकदा जेवण अशा वातावरणात होत असे. बरेचदा वीज नसायची, आणि रात्रीचं जेवण घराबाहेरच्या कट्ट्यावर खावं लागायचं. एकीकडे, देशभरातील ऊर्जाप्रकल्प सुरू राहण्यासाठी कोळशाच्या खाणी खोदल्या जात होत्या, त्याच खाणींच्या परिसरात दिवसाला सोळा-सोळा तास वीजपुरवठा नसायचा, याबद्दल कोळसा खाणींमधले कर्मचारी खदखद व्यक्त करत.

धाब्यांवरच्या जेवणाची आणखी ठळक आठवण प्रवासाशी जोडलेली आहे. धनबादच्या बाहेरचा भाग आणि जी. टी. रोड यांदरम्यानच्या निर्जन आणि अंधारलेल्या भागातून आम्ही प्रवास करत धाब्यावर जायचो. वाटेत अडकून पडायचे प्रसंग अनेकदा यायचे. अशा वेळी कुटुंबांचे परस्परांशी असणारे दृढ संबंध मदतीला येत असत. आम्ही लहान-मोठा ताफा करून त्या धाब्यावर जायचो. ग्रामीण भागातल्या दडपून टाकणाऱ्या अंधारातून आमच्या गाड्यांच्या हेडलायटींची माळ वाट कापत पुढे जात असे. सुमारे दशकभराने माझ्या वडिलांची बदली बंगालमधील राणीगंज कोळसाखाणींमध्ये झाली. तिथला प्रवास आणखीच निर्जन भागांमधून करावा लागायचा. तिथे लुटमारीची शक्यताही जास्त होती, त्यामुळे आमच्या कारच्या मागे आणि पुढे जाणारी सशस्त्र सुरक्षारक्षकांची कार असायची.

स्वाभाविकपणे कोळसाखाणींच्या परिसरात बाहेर कुठे खाण्याबद्दल विचार करत असताना माझ्या मनात दोन गोष्टी अनिवार्यपणे येतात- लांब पल्ल्याचे कारमधून केलेले प्रवास आणि काहीतरी धोका उद्भवण्याची टांगती तलवार, असे दोन पैलू या खाद्यस्मृतींना आहेत. जेवण पचवण्याच्या दृष्टीने हे असे अनुभव काही फारसे पोषक नाहीत, असं कोणाला वाटू शकेल. पण प्रत्यक्षात याचा परिणाम विपरित नव्हता. या प्रवासानंतर आपल्याला काही चवदार पदार्थ खायचे आहेत, अशा भावनेने प्रत्यक्षात जेवतानाचा आनंद द्विगुणित होत असे.

धूर आणि आरसे

शालेय शिक्षण झाल्यावर मी अनेक वर्षं ब्रिटनमध्ये घालवली. तिथून परतल्यावर थोडा काळ दिल्लीत राहून मी मुंबईला आलो, आणि १९९०च्या दशकारंभापासून आत्तापर्यंत मी तिथेच राहतो आहे. मुंबईत एक दशकभर राहिल्यावरही मला अन्नाची चव आधीसारखी का लागत नाहीये याचं अचूक कारण सापडत नव्हतं. अगदी नेहमीच्या खाण्यातल्या आणि पूर्वीपासून चालत आलेल्या पाककृतींनुसार केलेल्या पदार्थांच्या बाबतीत असं घडत होतं. हे आळसातून आलेल्या स्मरणरंजनासारखं आणि अनेकदा अनेकांनी उगाळून झाल्यासारखं वाटू शकतं- ‘आजकाल पूर्वीसारखं अन्न (किंवा सिनेमा, किंवा बातम्या, किंवा एकंदरत नागरी सभ्यतेची जाणीव) खायला मिळत नाही!’ पण मी म्हणतोय त्यातलं तथ्य नाकारता येणार नाही.

माझ्या मनातल्या शंकेचं उत्तर आणखी दशकभराने अचानक समोर आलं. माझी बायको आणि मी मुंबईच्या पूर्वेला सुमारे पाच तासांवर असणाऱ्या एका तुलनेने अज्ञात वन्यजीव अभयारण्यातून कार चालवत जात होतो. वनांनी वेढलेल्या डोंगररांगांमध्ये हे अभयारण्य आहे. डोंगरांवर असणाऱ्या तिथल्या रेस्ट-हाऊसमध्ये आम्ही पोचलो तेव्हा स्थानिक फॉरेस्ट-गार्ड म्हणाला की, रेस्ट-हाऊसमध्ये स्वयंपाकघर नसल्यामुळे तिथे खायची सोय होणार नाही. विशीमधल्या त्या फॉरेस्ट-गार्डचं नाव अशोक होतं. त्या जंगलात तो पूर्णपणे एकट्याने राहत होता आणि त्याच्या हाताशी कोणतंही सहायक उपकरण नव्हतं (२०००च्या दशकारंभीचा हा काळ आहे), आणि तो माझ्या माहितीतला बहुधा सर्वांत परिपूर्ण हौशी पक्षी-वैज्ञानिक होता, त्यामुळे त्याचं नाव माझ्या स्मरणात घट्ट रुतून बसलं आहे. एका अपरिचित पक्ष्याचा आवाज आला तेव्हा तो उत्साहाने म्हणाला, ‘हा, हा व्हाइट ब्राउड इंडियन सिमिटार बॅब्लर आहे!’ तो धडधडीत खोटं बोलतोय, असं मला वाटलं. पण मला वाटलं ते चुकीचं होतं. आपण एकाच वेळी फॉरेस्ट-गार्ड, वाइल्डलाइफ-गाइड आणि आचारी म्हणून काम करत असल्याचं अशोक म्हणाला. त्याने आमच्यासाठी जेवण तयार करायची तयारी दर्शवली, पण त्यासाठी एक अट घातली. आम्हाला सगळा शिधा आणून द्यावा लागेल, कारण त्याच्याकडे एक कणभरही धान्य वा भाजी जास्तीची नव्हती.

मग आम्ही पुन्हा कार घेऊन अर्धा तास प्रवास करत डोंगरावरून खाली आलो (पुन्हा प्रवास!). जवळच्या गावातून आवश्यक साधनसामग्री घेतली आणि अशोकने गडबड न करता पण सराईतपणे केलेलं जेवण रात्री जेवलो. पहिल्या घासापासूनच आम्हाला अन्नाची सहजपणे तोंडात विरघळणारी चव जाणवत होती, अनपेक्षितपणे मोहक चवी रेंगाळू लागल्या. ते जेवण इतकं खास का वाटत होतं, ते माझ्या लक्षात आलं नाही. वास्तविक जेवणात साधेच पदार्थ होते- मासे, डाळ, बटाटा-कोबी, रोटी; त्याला धन्या-जिऱ्याची फोडणी देऊन मसाले घातलेले. मग अचानक माझ्या डोक्यात प्रकाश पडला. रेस्ट-हाऊसमध्ये स्वयंपाकघर नव्हतं, त्यामुळे शेगडी किंवा गॅसची सोयही नव्हती. अशोकने मातीच्या चुलीत लाकडं पेटवून त्यावर अन्न शिजवलं. हीच ती चव! सगळ्या संवेदनांवर मोहक जादू करणारी आणि इतकी वर्षं मला जेवणाच्या चवीमध्ये काहीतरी चुकल्याचुकल्यासारखं वाटायला लावणारी ही चव होती. लाकडाच्या धुरामुळे, कोळशाच्या धुरामुळे आणि मातीमुळे त्या साध्यासुध्या अन्नाला पारलौकिक चव प्राप्त झाली होती. कोळसाखाणींच्या परिसरात साधारणपणे सर्वत्र अन्न असंच शिजवलं जात होतं- बहुतांश लोक लाकूड नि कोळसा वापरून चुली पेटवत आणि त्यावर स्वयंपाक करत असत. तोवर ‘एलपीजी’ सिलेंडर स्वयंपाकघरात आलेले नव्हते, किमान दुर्गम भागांमध्ये तरी त्यांचा वापर होत नव्हता (रॉकेलवर चालणारे स्टोव्ह होते, पण आजूबाजूला इतका कोळसा पडलेला असताना अशा स्टोव्हचा काही वापर करायची गरज नव्हती).

तर, लाकूड नि कोळसा यांनी पेटवलेल्या आगीवर शिजवलं जाणारं अन्न त्या धुराच्या वासामुळे अधिक रुचकर होत असेल, असा विचार १९७०च्या दशकात आम्ही केला नव्हता. तिथे ते रोजचंच होतं, त्यामुळे सवयीचं झालं होतं. आपल्याला अभिनव आणि तुरळक दिसणाऱ्या गोष्टी हव्याशा वाटतात, मग त्या प्रत्यक्षात अगदी जुनाट वा फाटक्यातुटक्या असल्या तरी चालतात. रोजमर्राच्या गोष्टी कितीही मूल्यवान असल्या तरी आपण त्यांच्याकडे फारसं लक्ष देत नाही. या पृथ्वीवरील झाडंझुडपं किंवा शुद्ध पाणी- हे सगळं आपण गृहित धरतो. या गोष्टी आपल्यापासून हिरावून घेतल्या किंवा त्यांचा ऱ्हास झाला की त्यांची किंमत आपल्याला कळते. कोळसा नि लाकूड यांच्या जागी एलपीजी आला तेव्हा आम्हाला दगडी कोळशाचा, त्याच्या वापरातून केल्या जाणाऱ्या आगीचा आणि त्यातल्या धुराचा गंध जाणवायला लागला. आज असा धूर नि माती किती मूल्यवान झालेत याचा दाखलाच हवा असेल तर ‘वूडस्मोक पिझ्झा’ किंवा अस्सल ‘हंडी डोपिआझा’ ही पदार्थांची नावं पाहता येतील.

तर, कोळसाखाणींच्या प्रदेशात बहुतांश खाद्यानुभवांसोबत मिळालेलं घरेलूपण आणि त्यासाठी केलेले प्रवास, यात धूर या आणखी एका महत्त्वाच्या घटकाची भर घालावी लागेल. या धुराचा गंधकयुक्त गंधसुद्धा या अन्नपदार्थांच्या चवीशी जोडला गेला होता. हे अर्थातच जास्त काळ सुरू राहणं शक्य नव्हतं. विसाव्या शतकाचा शेवट होत असताना कोळशाकडे ऊर्जादायी चमत्कारी खडक म्हणून पाहिलं जात नव्हतं तर हवा आणि पाणी अशुद्ध करणारा तो एक अपराधी, प्रदूषणकारी घटक ठरला होता. त्यामुळे स्वाभाविकपणे स्वयंपाकाच्या साधनांमधूनही त्याचं वगळलं जाणं अनिवार्य होतं.

***

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

oneating-border
Scroll to Top
  • The views expressed through this site are those of the individual authors writing in their individual capacities only and not those of the owners and/or editors of this website. All liability with respect to actions taken or not taken based on the contents of this site are hereby expressly disclaimed. The content on this posting is provided “as is”; no representations are made that the content is error-free.

    The visitor/reader/contributor of this website acknowledges and agrees that when he/she reads or posts content on this website or views content provided by others, they are doing so at their own discretion and risk, including any reliance on the accuracy or completeness of that content. The visitor/contributor further acknowledges and agrees that the views expressed by them in their content do not necessarily reflect the views of oneating.in, and we do not support or endorse any user content. The visitor/contributor acknowledges that oneating.in has no obligation to pre-screen, monitor, review, or edit any content posted by the visitor/contributor and other users of this Site.

    No content/artwork/image used in this site may be reproduced in any form without obtaining explicit prior permission from the owners of oneating.in.