भाषांतर- कल्याणी झा.
प्रत्येक घराला एक कहाणी असते आणि त्या कहाणीत असते एक स्वयंपाकघर. त्या स्वयंपाकघरातून जर कोणते शब्द ऐकू येत असतील तर ते म्हणजे “क्या बात है!”
अन्नाचे आणि संगीताचे काय नाते असेल? पंडित आणि उस्तादांच्या बोलण्यात येत असे की ‘ज्याला खावं कसं माहित नाही, त्याला वाजवाव कसं तेही कळणार नाही.’ त्यांच्या म्हणण्याचे तात्पर्य हे की रसास्वाद घ्यायला तुमची ज्ञानेंद्रिये तयार व्हायला हवीत. रसास्वाद हा ऐंद्रिय, आनंददायी आणि रुचकर असा अनुभव आहे. अगदी सगळे शिकून, रियाज करून, संगीताचा अभ्यास करूनही तुम्ही अभिरुचिहीन राहत असाल, तर माणूस बनायलाही तुम्ही असमर्थ आहात! माफ करा! पण पंडित आणि उस्ताद असे कठोरही बोलू शकतात!
संगीत शिकणे आणि स्वयंपाक करणे यांत कधीकधी तुलना केली जाते. वस्तुत: अनेक संगीतकार आपल्या शिष्यांना पाककौशल्ये शिकवायचे. त्यातून शिष्यांपर्यंत ज्या महत्त्वाच्या गोष्टी पोहोचायच्या त्या म्हणजे सबुरी, योग्य प्रमाण(अंदाज), शिजलेल्या आणि न शिजलेल्या अन्नाच्या रंगातल्या फरकाचे ज्ञान आणि स्वाद. मी अनेक वेळा गुरूंनी स्वत: शिजवून आपल्या शिष्यांना खायला घालताना बघितले आहे. असे करण्यातून संगीतातील काही पैलू शिष्यांपर्यंत संक्रमित होतात आणि परिणामी त्यांच्या ऐंद्रिय संवेदना जागृत होतात, अशी त्यांची धारणा होती. अन्नाच्या चवीमधून चढलेला कैफही परमानंद देतो, जो प्रेमाच्या तोडीचा असतो आणि ज्याने संगीत साधनेत तल्लीन व्हायला मदत होते, असेही त्यांचे मानणे होते. यातला सूचितार्थ असा, की कलावंताचे व्यक्तिमत्व समृद्ध होण्यासाठी रसास्वाद आणि रसानुभूती या गोष्टी महत्त्वाच्या आहेत.
माझा मुंबईच्या चेंबुरमधल्या ६/२० रुक्मिणी अपार्टमेंटमधला जन्म म्हणजे केवळ एक योगायोग आहे, असे मला वाटत नाही. भारतीय तत्त्वज्ञानात अशी एक धारणा आहे, की आपल्याला ज्याच्या पोटी जन्म घ्यायचा आहे ते उदर आत्मा शोधून काढतो. या न्यायाने मी अनेकविध चवी आणि वासांच्या सान्निध्यात एक छोटासा ‘जीव’ म्हणून जन्माला आलो. त्यात पहिला क्रमांक माझ्या आईच्या पाककृतींचा आहे, ज्या रत्नागिरीच्या समुद्रकिनाऱ्यावरून आलेल्या आहेत. नंतर माझ्या वडिलांच्या पाककृतींचा, ज्या राजस्थानमधून आलेल्या आहेत. नंतर माझ्या मामीच्या पाककृतींचा क्रमांक लागतो, ज्या मराठा कुटुंबातून मिळालेल्या आहेत. हे इथेच थांबत नाही, आमच्या डाव्याबाजूला राहणारे पिल्लई, उजव्याबाजूला राहणारे सेठना कुटुंब, वर राहणारे कर्नाटकचे कुंदेरा कुटुंब आणि चेन्नईचे अय्यर कुटुंब, खाली राहणारे बंबूट मुसलमान बोरा कुटुंब यांचाही समावेश आहे. शिवाय आमच्या समोरच्या, रस्ता क्रमांक १७ वर राहणाऱ्या आम्हा सोळा मुलामुलींनी बनलेल्या मित्रांच्या गटाचा समावेश केला तर त्यात अय्यरपासून अय्यंगारपर्यंत, ओडिसी ते शेट्टी, पंजाबी आणि सिंधींपर्यंत झाडून सगळ्यांचा समावेश होता.
मी जवळजवळ शाकाहारीच होतो. अगदी ब्राह्मण घरात वाढल्यासारखा. माझे आवडते पदार्थ म्हणजे भेंडीची भाजी, बटाटा, डाळमेथी आणि अजून अशाच काही भाज्या. जेव्हा केव्हा मांसाहारी जेवण बनवले जायचे तेव्हा मी लगेच माझ्या मामाच्या घरी जायचो आणि माझ्यासाठी गूळ घालून केलेले वरण आणि बटाट्याची भाजी बनवायला सांगायचो. असे दर रविवारी, जेव्हा आमच्याकडे पाहुणे असायचे आणि माझे वडील चिकन बनवायचे, तेव्हा व्हायचे. शिवाय दर मंगळवारी माझी मामी उपास करत असे आणि तो सोडायच्या वेळी संध्याकाळी काहीतरी खास बनवत असे, ज्याला माझ्यासारख्या स्वयंघोषित ब्रह्मणाचीच हजेरी असे. तिने बनवलेल्या आमटीच्या वासाचे तर मी वर्णनंच करू शकत नाही. तळमजल्यावरून तो वास दरवळत पहिल्या मजल्यावर यायचा आणि त्यामागे माझे ‘नाक’ चालत चालत खोली क्र. ४ च्या दरवाज्यासमोर येऊनच थांबायचे. मामीच्या आमटी बनवण्यात किती आपुलकी होती याचा साक्षात्कार आज जेव्हा मॉलमधले बाहेरचे अन्न खाल्ले जाते, तेव्हा होतो. त्या अन्नात स्वत:ची अशी काही ‘नाममुद्रा’च नसते. तिने बनवलेल्या आमटीचा अनुभव इतका उच्च कोटीचा असे की मन नि:शब्द व्हायचे. कलेतला सगळा आनंद जणू एकवटायचा, खाल्ल्याचे समाधान मिळायचे. हा एक प्रकारचा; छोटा का असेना; मोक्षप्राप्तीचा अनुभवच म्हणता येईल. यानंतर एकमेव ‘ध्यानधारणा’ उरायची, ती म्हणजे झोप काढणे! प्रत्येकवेळी मामीला हीच चव कशी जमायची याचे मला राहून राहून आश्चर्य वाटते.
माझी आईदेखील बटाटा-मटार ब्रेडरोल, भेंडीची भाजी, आलूपराठा, कोंबडीवडे( म्हणजे नाचणीचे पीठ, मेथीचे दाणे, पालक, जिरे आणि मेथी असे मिळून तळलेली पुरी) डाळमेथी बनवायची. पण माझ्या मामीच्या घरी लिओनार्दो द विंचीपासून उत्तरआधुनिक चित्रकारांच्या चित्रांची पुस्तके, तसेच अभिजात संगीत, लोकसंगीतापासून जॅझ म्युझिकपर्यंत जगभरातल्या संगीताची ध्वनीमुद्रणे होती. पण आमच्या घरी मात्र ध्रुपद घराण्याच्या प्रत्यक्ष कार्यक्रमांची ध्वनीमुद्रणेच होती. आमच्या आणि मामीच्या घरात हाच एक फरक होता.
वयाच्या नवव्या वर्षापर्यंत मी थोडेफार तंदूर खात होतो. चौदाव्या वर्षी मात्र मी प्रथम मेथीचिकन खाल्ले. माझे ‘मेथीवेड’ वडिलांना माहित होते, त्यामुळे त्यांनी मला खाऊन बघायला सांगितले. मी अत्यंत नाखुशिने त्यांचे म्हणणे ऐकले. माझे आदरणीय वडील हे उत्तम स्वयंपाकी होते, हे मी लोकांकडून ऐकून होतो, पण जेव्हा मी चिकन चाखले तेव्हा त्याचा अनुभव आला. त्या एका घासाने माझ्या तोंडाला पाणी सुटले, डोळे मोठ्ठे झाले! नंतर जणू सुखात हरवून गेल्यासारखे बारीक झाले. लोक ज्या प्रेमानुभवाबद्दल फक्त बोलतात किंवा लिहितात त्या प्रेमाचे खरे दर्शन जणू घडत होते. मी त्या दिवशी शांतपणे जेवलो आणि मला मांसाहारी पदार्थ आवडत नाहीत ही बाब पार विसरुनही गेलो.
माझ्या वडिलांच्या म्हणजे उस्ताद जिया मोहिउद्दीन डागर, यांच्या निधनानंतर त्यांच्या लहान भावाने, म्हणजे उस्ताद जिया फरीदुद्दीन डागर यांनी मला त्यांच्या पंखाखाली घेतले. ते गायक होते. संगीत आणि पाककलेतील अचूकता यासाठी मोठ्या बंधूंचे नाव घेतले जायचे. लहान बंधूदेखील अफाट व्यक्तिमत्व लाभलेले होते. त्यांच्या स्वयंपाकातही मोठ्या भावाचा स्वभाव प्रतिबिंबित झालेला होता. मेजवानी असेल तेव्हा भाज्या, मिठाई आणि मांस यातले मुख्य भाग तेच बनवायचे व त्यांच्या शिष्यांना आणि मित्रांना खायला घालायचे. अशाच एका मेजवानीत उस्तादांनी मटण बनवले होते. मी सहजच नाव विचारले तर ते नुसते हसले आणि म्हणाले – “खा!” पहिला घास खाताक्षणी त्याची चव जिभेवर अशी काही पसरली की काय सांगू! मला त्याला दाद द्यायचीही शुद्ध उरली नाही. त्या एका घासात अनेक घासांचे रस भरले होते. मी तीनचार घासच खाल्ले आणि थांबलो. त्या चवीने आणि त्यातून निर्माण झालेल्या संवेदनेने भारावलो आणि माझी चित्तवृत्ती समाधानी झाली. त्यापुढे मी खाऊ शकलो नाही. ही परिपूर्णतेची जाणीव पुढचे तीन दिवस टिकली. त्या तीन दिवसांत मी जे काही वाजवले ते माझ्यातून सहज झरते आहे असे वाटत होते.
एकदा स्पिकमॅकेसाठी नॉर्वेत गेलेलो असताना तिथल्या लहान मुलांना संगीताची ओळख म्हणून दहा-दहा मिनिटांचे तुकडे वाजवून दाखवत होतो. तेव्हा योगायोगाने एका मनुष्याची ओळख झाली. हा मनुष्य साधारण वीसजण बसू शकतील असे एक रेस्टॉरंट चालवायचा. रमजानच्या काळात आमची ओळख झाल्यामुळे उपास सोडताना त्याने मला खाऊ घातले. त्याने माझ्यासाठी पटकन छोले आणि रोटी बनवली. फ्रीजरमधून काढेलेले ते अन्न त्याने अक्षरश: दहा मिनिटांत बनवले. पहिल्या घासालाच प्रश्न पडला, की फ्रीजरमधून काढलेले हे गोठलेले अन्न झटपट शिजवणे आणि त्याला स्वादिष्ट बनवणे ह्या दोन्ही गोष्टी याला कशा जमल्या? माझे सहकलाकार सुनंदा आणि मिथिलेश एकमेकांच्या तोंडाकडे बघत बसले. नेमके काय घातले असेल यात? काहीतरी असे आहे जे आमच्या लक्षात येत नाहीये. या कुतुहलातून आम्हाला पुढे असा शोध लागला, की हा भला माणूस खरे म्हणजे एक सूफी आहे ज्याने या रेस्टॉरंटच्या पडद्यामागे स्वत:ला दडवले आहे.
माझ्या या ‘रस’यात्रेत मी आता अशा ठिकाणी येऊन पोहोचलो आहे जिथे विवेकाच्या छत्रछायेखाली स्वत:ला स्वीकारणे, विसर्जित करणे, शोधणे, एकत्रित करणे, प्रतिवाद करणे, असहमती दर्शवणे, विद्रोह करणे, आक्षेप घेणे, भावना व्यक्त करणे आणि स्वत:ला संतुष्ट करणे हे शिकलो आहे. आणि हे मला अन्नाने शिकवले आहे.