अनुवाद: शैला मावजो
Subodh Kerkar, 2021
लाल, पिवळा, नीळा, पिंगट, काळा अशा विविध रंगांच्या छ्टा मिरवणाऱ्या मावळतीकडे विस्फारलेल्या नेत्रांनी पहाताना संध्याकाळ केव्हा सरली कळलंच नाही. सुर्यास्त पहायला आसुसलेल्या आमच्या डोळ्यांना सुर्याच्या कलानं रंग बदलणारं आसमंतच अधिक आकर्षित करत होतं. आमचं आपलं ठीक आहे. आम्ही दोघं आमच्या दोघांना घेऊन अशीं अधून मधून समुद्रकिनाऱ्यावर जातच होतों. पण सध्या नागपूरला असणारा व चार दिवसांसाठी आलेला माझा मेहुणा गुरू, त्याची बायको व दहावीची परीक्षा नुकतीच दिलेली त्यांची मुलगी मंजिरी, समोरचा हा देखावा वेडीपिशी होऊन पहात होती.
माजोर्डेचा बीच मला अधिक आवडतो. ऐसपैस व शांत. पण गुरू म्हणाला आज कोलव्याला जाऊं, म्हणून कोलव्याला आलो होतो. अंधारानं चादर पसरायला सुरुवात केली तेव्हा शीलानं उठायची तयारी केली, “अहो, घड्याळाकडे पहा जरा. चला उठा आता.”
“थांब ग, किती छान वारा सुटलाय. बसूं थोडा वेळ.”
पण ती उठलीच. “तुमचं आपलं बरं. इकडे निवांत गप्पांना बसाल आणि घरी गेल्यावर ‘भूक लागलीय, वाढ लवकर’ म्हणाल तेव्हां काय वाढूं? मला अजून पोळ्या करायच्यात.”
आम्ही चौघं आणि तिन्ही मुली त्या छोट्या मारुतीत कशी कोंबून बसलो ते आम्हालाच माहीत. पुढच्या सीटवर तिघं बसल्यामुळें मी जरा सावधपणे व सावकाशीने चालवत होतो. कोलवेचं चर्च मागे टाकून पुढं निघालो तेवढ्यात तो खमंग वास नाकात भरला. नकळत माझा पाय एक्सलरेटर वरून उठला.
“वाउ! कसला रे हा वास ओळखीचाच?” मेहुणा म्हणाला.
तोंडाला सुटलेलं पाणी लपवत मी गाडी थांबवली. “थांब हं. बघून येतो.” गाडी रस्त्याच्या कडेला उभी करून मी उतरलो. आणि हुंगत हुंगत बेकरीकडे पोचलो. आतमधे पाव भाजणं चाललं होतं. बाहेर तिघे चौघे पावासाठीं उभे होते. मी त्यांच्या मागे उभा राहिओ. माझा नंबर आला तेव्हा बेकरनं विचारलं, “कोणते हवेत?”
“फॉर्मातले.”
“किती देऊं?”
मी अंदाज केला. घरी भाजी तयार आहे. पोळ्या करण्यापेक्षा पावच नेलेले बरे. दरेकी दोन म्हणजे सात जणांना – “पंधरा दे.”
“पिशवी?”
“कागदात दे गुंडाळून. गाडी जवळच आहे.” आणि कागदांत गुंडाळलेले ते पंधरा पाव घेऊन मी गाडीकडे आलो. पाव गाडीत पोचायच्या आगोदरच पावाचा दरवळ पोचला होता. पाव हातांत पडल्या बरोबर शीला खुष झाली.
“बरं केलस. आता घरी गेल्यावर पोळ्या लाटायची कटकट मिटली.”
गाडी स्टार्ट करून मी म्हणालो, “जिभेला पाणी कसं सुटलय बघ. एक दे बघूं. मी असाच खातो.”
“ते पार्सल मागे दे पाहू” गुरूनं पुढच्या सीटवर ओझं नको म्हणून मागून घेतलं.
शीलानं स्वत: साठी एक पाव काढून घेतला आणि पार्सल मागच्या सीटवर दिले.
“असा अव्हनफ्रेश मिळाला की सुकासुद्धा मस्त लागतो.” मी पावाचा तुकडा तोंडात घोळवत म्हणालो.
मागच्या सीटवरील गुरूकडून प्रतिसाद मिळाला नाही. पावाचा वास घेत बसला असावा. बेतालभाटी गांव यायच्या आधीच माझा पाव खाऊन संपला. जिभेला आवरलं नाही. “आणखी एक दे ग.”
“नको हं. मग तुला जेवण जाणार नाही.” असं म्हणाली खरी पण मागल्या सीटवरून एक पाव मागून घेतलाच. अर्धापाव माझ्या हातात देत म्हणाली, “अर्धाच घे. अर्धा मी खाते.”\
घरी पोचेतो आठ वाजून गेले. सगळ्यांना दाराशी उतरवून मी गाडी पार्क करून आलो.
“बरं झालं की नाही? तुला पोळ्या लाटत बसायला नको.” किचनमधील खुर्चीवर बसत मी म्हणालो.
“ते कुठलं चुकायला आलंय?” पहातो तर ही कणीक मळायच्या तयारीनं पोळपाट लाटणं घेतलेलं.
“अग, मी तर हिशेबानं पंधरा पाव -”
“आणले होते. आता घरी येई पर्यंत चारच उरलेत.”
खरय तिचं. सगळ्यांनाच जिभा आवरणं शक्य झालं नसावं.
“ठेव ते सामान. चल बाहेर जाऊन बस, भावजयीकडे गप्पा मारत. मी जाऊन पाव घेऊन येतो.”
गुरू म्हणाला, “चल, मीही येतो.”
मानुएलचं ‘खोर्न’ (भट्टी) तसं जवळच, चालत पांच मिनिटांच्या वाटेवर होतं.
पहातो तर त्याने संध्याकाळी केलेले पाव संपत आलेले. आतां सकाळच्या पावांची तयारी जोरात सुरूं झालेली.
“दहा पाव दे, मानुएल.”
मानुएलचा चेहरा पडला. “तूं उशीर केलास यायला.” आणि बास्केटमधे वाकून पाहिलं.
“फॉर्मांतलें आठ उरलेत. पण ‘पोळी’ आहेत. देऊ का?”
सायकलच्या ब्रॅकेटला मोठ्या टोपल्या लावून विकायला नेलेल्यांनी उरलेले जे परत आणले होते त्यातील आठ पाव व दोन पोळी घेऊन आम्ही परतत होतो. वाटेत वासुचा गुत्ता लागला. तिथं एकटा, तो मजूर असावा, पिऊन इतका तर्र झाला होता कि त्याला उभं रहावत नव्हतं.
Subodh Kerkar, 2021
“अरे, कुणीतरी मानुएलीकडे जाऊन एक पाव घेऊन या रे.
“बोललेलं कानावर पडलं तसा मी म्हणालो, “अरे वासु, मानुएलकडील पाव संपलेत. शेवटचे मीच घेऊन आलोय. हा घे आणि कोंब त्याच्या तोंडात.” एक मऊ पाव काढून त्याच्या हातावर ठेवला. आ वासून हे नाटक पहाणाऱ्या गुरूचा हात ओढून मी घराच्या वाटेला लागलो.”त्या दारुड्याला पाव कशाला तो?” वाटेत गुरूनं विचारलं.
“तुला माहीत नाही? अरे, दारू जेव्हा चढते तेव्हा ती उतरवायचा सगळ्यात चांगला उपाय म्हणजे पावाच्या मधला मऊ भाग त्याला खाऊं द्यायचा. पाव म्हणे अल्कोहोल शोषून घेतो.” मला असलेली माहिती मी त्याला पुरवली.
रात्री जेवताना गुरू म्हणाला, “मघासच्या त्या पावांची सर ह्या पावांना नाही बाबा.”
“कशी असणार? त्या पावांना ‘सूर’ घातली होती. म्हणून तो वास दरवळत होता.”
“सुर? यू मीन दारू? लिकर?” मंजिरीनं आश्चर्याने विचारलें.
गुरूची मुलगी हुशार आहे. गुरूला वाटतं तिनं इंजिनिअर व्हावं. पण तिचा म्हणे पुढं काय शिकावं ह्याचा निर्णय झालेला नाही. तिला सारखे प्रश्न पडत होते. ह्या प्रश्नालाही वडीलांनीच उत्तर दिलं, “सूर इज टॉडी. नीरा असते ना, तशी. पीठ आंबवण्यासाठी ती वापरतात.”
“ते खरे ट्रॅडिशनल पाव. हल्ली चांगली सूर मिळत नाही आणि महागही पडते म्हणून खुपसे बेकर यिस्ट वापरतात. त्यामुळें मघासच्या सारखी चव येत नाही.” मी खुलासा केला.
गुरुला ती म्हण आठवली, “ते फिरंगी गेले. ते ‘उंडे’ (पाव) गेले.” असं म्हणून तो सुस्कारला.
“फिरंगी गेले हे खरं. पण गोव्याचे ‘पदेर’ आणि गोव्याचे ‘उंडे’ मात्र शाबुत आहेत हं! अगदी गोंयकारांच्या अस्मितेचं प्रतिक बनून.”
“खरं असेल तुझं. पण दिवस आदले राहिलेले नाहीत हे तुला मान्य करावेच लागेल. काल परवाचीच गोष्ट सांगतो….. ” असं म्हणून गुरूनं त्याच्या कानावर आलेली ती गोष्ट सांगितली.
गोष्ट अशी होती. त्याच्या लहानपणचा मित्र आबदोन जुवारी गावांत रहाणारा. त्याचा बाप म्हणे आफ्रिकेत कामाला होता. आई गेल्यावर बापाने त्याला दारेसलामला नोकरीसाठी नेला. मागे घर रिकामे राहू नये म्हणून सुब्राय नांवाच्या एक कर्नाटकी मित्राला तात्पुरतं रहायला दिलं. आबदोन दारेसलामहून इंग्लंडला गेला. तिकडून पुढे ऑस्ट्रेलियाला. आता तीस वर्षांनी परतला तेव्हा पाहिल्यास पूर्ण घर गायब. आता तिथं एक बिल्डिंग उभी. घर कुणीतरी गिळून टाकलेलं.
“पण ती जागा तर तुझ्या मित्राचीच ना?” मी विचारलं.
“पण ह्याच्याकडे कुठले कागदपत्र? वकील केला तर त्यानं सांगितलं ती जागा ‘कोमुनदादीची’ (गांवकारी संस्थेची). आतां कांहीच करता येणार नाही.” एवढं बोलून गुरू म्हणाला, “पाहिलेस ना. घर कुणाचं आणि खाल्लं कोणी! त्याचा तो मित्र सुब्राय म्हणे घर विकून पैसे घेऊन होनावरला गेला. इकडे अबदोन बिचारा पूर्ण फसला.”
“चला! ‘सुलच्या पदेरान खावं’.” मी म्हणालो.
“म्हणजे काय?”
“ती एक म्हण आहे कोंकणीत. आपली वस्तु तिसऱ्याच्या नशीबात असते तेव्हा वापरतात.”
सगळ्यांची जेवणं होऊन सुद्धां दोन पाव उरले. “उरलेले सकाळीं भाजून दे मला. मी संपवीन ते.”
नाहीतरी विस्तवावर भाजलेले शिळे पाव मला आवडतात.
“तरी बरं. भाजी चांगली झाल्यामुळें तेवढे तरी संपले.” शीला हळूच माझ्या कानांत म्हणाली, “नाहीतर त्या पावांचा सांजा कर म्हणाला असतास तूं.”
खराय तें. पाव उरले तर त्याचे तुकडे करून कांदा-मिरचीची फोडणी मारून सांजा म्हणून खायला मला आवडतं. त्या आठवणीने तोंडाला पाणी सुटलं.
त्या रात्री आमचं ‘उंडे’ पुराण मस्त रंगलं. गप्पा मोठ्यांच्या रंगल्या तरी मुलीही लक्ष देऊन ऐकत होत्या. मी माझ्या लहानपणांतील आठवणी काढल्या. त्यावेळी एक एक पाव केवढा मोठा असायचा. सूर घालून आंबवल्यामुळे कसा छान चविष्ट लागायचा. आणि पावाचा भाव होता एका आण्याला एक.
“आण्याला म्हणजे?”
मी मुलींचं अज्ञान दुर करत म्हणालो, “त्या काळी रुपयाचे सोळा आणे असायचे.”
“यू मीन तेव्हा एका रुपायाला सोळा पाव मिळायचे?”
लहानपणी केलेली मस्ती आठवली. दर श्रावणांत गांवातील शाळेंत भजनाचा कार्यक्रम व्हायचा. मला भजनापेक्षां इतर मुलांच्या सोबतीने गप्पा गोष्टी, चेष्टा मस्करी व हुंदडायला आवडायचं. भजन रात्री नऊ ते बारा चालायचं. साडेअकराच्या दरम्यान पदेराच्या खोर्नांत भाजलेल्या पावांचा वास नाकांत दरवळायचा. शाळेच्या दोन्ही बाजुला दोन खोर्न होते. एक कामीलचं, दुसरं जॅक पिदादीचं. त्यातल्या जॅक पिदादीच्या पावाचा वास खमंग असायचा. रात्री नऊला तो पायांनी पीठ मळताना दिसायचा. मळून झाल्यावर भाजायला सुरवात व्हायची. छान वास आला म्हणून कधी आत शिरलो तर हातावर एक पाव पडायचाच. पण जर आम्ही चार पांचजण एकदम आत शिरलो तर त्याला ते परवडणार कसं? आम्हांलाही तें योग्य वाटत नव्हतें. मग आम्ही घरांतले पळवून आणलेले एक दोन आणे देऊन पाव विकत घेऊन खायचो. असे गरम पाव नुसते खाण्यातली गोडी आगळीच…..
तेवढ्यात मितुची आठवण जागी झाली. मितु लहान असताना तिला घेऊन मी पाव आणायला जायचो. आणि ती हट्ट करून ‘कांकणां’ मागून घ्यायची. ती आठवण काढून मितुनं सांगितले, “बांगड्या सारखी कांकणा हातात घालून मी नाचत घरी यायचे, मग चहात बुडवून खायचे.”
Subodh Kerkar, 2021
“आमच्या नागपुरांत ठिकठिकाणी वडापाव मिळतो. छान लागतो. शिवाय पावभाजी.” मंजिरीनं आठवण काढली.
“इकडेही मिळतात ग! शिवाय रोस-आमलेट पाव, च्योरीस पाव, काफ्रियाल पोळी.”
मग मी त्यांना सांगत बसलों. च्योरीस म्हणजे सॉसेजीस. काफ्रियाल म्हणजे चिकनचा एक प्रकार, रोस आमलेट म्हणजे आमलेट बरोबर रस्सा- वगैरे. शिवाय हॉटेलांतून भाजी बरोबर उंडे व पाव कसे भरपुर खपतात. आणि लोळी पाव एका बाजुनं कापून त्यात मटण सुका किंवा चिकन स्टफ करून मिळते तेही सांगितलं.
मग मला कॉलेजसाठी मुंबईला गेलो होतो ती आठवण झाली. तिथल्या हॉस्टेलच्या मेसमधे नाश्त्याला सगळं मिळायचं. स्लाइस ब्रेड, पुरी भाजी….. पण गोव्याच्या उंड्यांची आठवण यायची. एक दिवस इराण्याच्या हॉटेलांत गेलो होतो. तिथं मस्का ब्रेड घेतला. बघतो तर आपला कातऱ्यांचा उंडो. भरपुर बटर लावलेला ‘उंडो’. त्याला तिथे ब्रून मस्का-पाव म्हणायचे. ती आठवण सांगून मी म्हणालो, “तेव्हा पासून गोव्याची आठवण आली की मी इराण्याच्या हॉटेलांत जायचो- मस्का पाव खायला. तिथं माझी उंड्याची तल्लफ भागायची.”
“एक सांग पाहू. गोव्याची आपली परंपारीक कयलोळी (तांदूळाची धिरडी), कांद्याची भाकरी, पोळे(आंबोळी), रोटी हे प्रकार असताना पाव कुठून आले? पोर्तुगीजांनी आणले होय?”
“होय. पोर्तुगीज गोव्यात आले तेव्हा त्यांना युरोपच्या पावांची सारखी आठवण येत होती. त्यांच्यासाठींच गोव्यात पावांची भट्टी आली. पण तुला माहीत आहे का? गोव्यात पहिला पाव बेक करणारा कोण होता? कुठला होता?”
“कोण?” सगळ्यांनी एकदम विचारलं आणि अभिमानानें माझी छाती फुलून आली.
“तो ह्याच गांवचा. माजोर्डेचा. म्हामाय सायबिणीच्या चर्चच्या मागे दोंगरी म्हणून वाडा आहे, तिथला. साष्टीहून पाव बारदेसला आणि तिथून गोवाभर पसरला. नंतर देशांत आणि पुर्ण आशिया खंडांतही.”
Subodh Kerkar, 2021
गुरु उत्तेजीत होऊन सांगू लागला, “मी कुठेतरी वाचलेलं, पुण्यांतील हिंदू म्हणे – अगदी लोकमान्य टिळक सुद्धा – त्या काळी पाव खाणं निषिद्ध समजायचे. गोव्याच्या हिंदूनी पाव खाणं कसं काय मान्य केलं?”
“अगदी सुरवातीला नव्हतेच खात. तें कशाला? टोमेटो सुद्धां युरोप मधून आलेत म्हणून त्याला मांसाची फळं लेखून निषिद्ध मानायचे एके काळी. खूप उशिरा हिंदूंनी स्वीकार केला पावाचा. माझ्या लहानपणी मडगांवचे अनेक लोक फक्त हिंदू पदेरांचेच पाव खात असत. माझ्या आठवणीत मडगांवांत कोंब वाड्यावर कृष्णा नांवाच्या माणसाची भट्टी होती. हे लोक तिथूनच पाव घ्यायचे. मला त्याची गंमत वाटायची.
रात्र फार झाली तशा मुली पेंगू लागल्या. जांभई देत मितूनं आठवण काढली, “मम्मा, आम्ही लहान असताना तूं आम्हाला ते गाणं म्हणायचीस बघ, अंगाईसारखं – तें म्हण ना.”
“ते कोणतं?”
“डोल बाई डोल, पदेराचे बोल”…. मितूने आठवण करून दिली.
“तुम्ही काय लहान आहात अंगाई म्हणायला?”
“म्हण ना ग आत्या, प्लीज! मी कुठं ऐकलय?” मंजिरीनं आग्रह केला.
“मला नाही ग आठवत आता.” असं शीला म्हणाली खरं पण आठवून म्हणून दाखवलंच. “डोल ग बाई डोल. पदेरान आणले बोल. महागडे तुझे बोल. माघारी आता पळ.”
तिचा सूर लागला आणि खरोखर मुली निद्रेच्या आधिन झाल्या.
“चला, तुम्हीही झोपा आता.” दमलेल्या शीलानं लटक्या रागानं म्हटलं. आणि त्याचाही लगेचच परिणाम झाला.
सकाळी सहाला उठून पहातो तर गुरू बाहेर व्हरांड्यात बसलेला. त्याला म्हणे सकाळीं पांचलाच उठायची संवय.
“तरी उठायला थांबलो होतो- कोंबडे आरवतील म्हणून. शेवटी पदेराचा पोंऽ पोंऽ हॉर्न ऐकला आणि उठलो.”
“अरे, जुने दिवस कुठं राहिलेत आतां? कोंबड्या, डुकरं, गुरं पाळायचं सोडूनच दिलय लोकांनी. आतां आम्हाला उठवायला कोंबडे आरवत नाहीत. हे सायकल वरून पाव विकायला फिरतात ना, त्यांच्या हॉर्नानी आतां आमची सकाळ उगवते.”
Subodh Kerkar, 2021
चहा नाश्ता झाला आणि मुली मागे लागल्या, ‘पदेराची गोष्ट सांगा.’
“अगं गोष्टी बिष्टी रात्री झोपताना सांगायच्या. तेव्हा सांगेन.”
तेवड्यात मानुएल पदेर दाराशी सायकल ठेवून आत शिरला. “अरे, रात्री तूं दहा पाव नेलेस आणि पन्नासाची नोट दिलीस. दहा रुपये माझ्याशीच राहिले. ते घे.” असं म्हणून त्याने दहाची नोट पुढं केली.
मी विसरलोच होतो तर तो ती घेऊन आला होता. “अरे, घाई कसली होती? उद्यां आलो असतो मी.”
“मुद्दाम नाही आलो. बाजारात चाललो होतो तर वाटेत देऊं म्हटलं.”
“आलायस तर थांब जरा.” त्याला बसवून आतून चहा आणून त्याच्या हातात देत विचारले, “मानुएलबाब, तुला फुरसत असेल तर एक उपकार करशील कां? आमच्याकडे पाहुणे आलेत त्यांना उंडे व पदेरा विषयी जाणून घ्यायचय. सांगशील?”
लगबगीनं जवळ आलेल्या मुलींना पाहून मानुएल खुषीत आला. मेहुणाही खुर्ची जवळ ओढून बसला. चहाचा घोट घेत मानुएलनं त्याच्या वडिलांपासून सुरवात केली. त्यानेच म्हणे ते खोर्न बांधलेलं. रात्री पाव भाजायचे आणि भल्या पहाटे अंगावर काबाय (ढोपरापर्यंत येणारा झगा) चढवून पावांचे ‘पांटे’ (मोठी टोपली) घेऊन विकायला निघायचा. हातात एक सहा फुटांचा दांडा. त्याला मध्ये तीन चार ठिकाणी चीर घालून त्यात पितळेच्या पातळ चकत्या अडकवलेल्या. दांडा जमिनीवर आपटताच चिम्म, खुळ्ळ आवाज घुमायचा. आवाज ऐकून गिऱ्हाईकं बाहेर यायचीं पाव घ्यायला. कुणाला पाव हवा असायचा तर कुणाला पोळी, कुणाला कांकणा, तर कुणाला बोल.
“आम्ही नागपुरांत त्यांना पाववाला म्हणतो. तर तुम्ही पदेर कां म्हणतां?”
मंजिरीचा प्रश्न ऐकून मानुएलनं खुलासा केला, “आम्ही कोंकणींत पदेर म्हणतो तो शब्द पोर्तुगीज ‘पादेयरु’ ह्या शब्दावरून आलाय. उंडो हा खरा कोंकणी शब्द. पाव हा शब्द पोर्तुगीज ‘पांउ’वरून आलाय. तुम्ही बेकरी म्हणता त्याला पोर्तुगीज भाशेत ‘पादेरीय’ म्हणतात. आतां ती पोर्तुगीज गेली आणि ही इंग्लीश आली. मध्यें हरवली ती आमची कोंकणी. अशी खंत व्यक्त करीत मानुएल उठला, “उशीर झाला मला. तुम्हाला खोर्न पहायचं असेल तर संध्याकाळी चारला या. आता दुपारी भट्टी पेटवणार. मग मी तुम्हाला सगळं दाखवतो. खोर्न, उंडे, पाव, बोल… येणार ना?”
“हो. हो. येणारच.” तें ऐकून मानुएल गेला.
दुपारची वामकुक्षी सुद्धां घेऊ दिली नाही मुलींनी. चार वाजायच्या आतच मागे लागल्या ‘पदेर कडे जाऊंया’ म्हणून. नवल म्हणजे मानुएल सुद्धां आमचीच वाट पहात होता. त्याचे खोर्न पाहिले. दोन मिटरांपेक्षां थोडी जास्तच उंच आसलेल्या त्या भट्टीने अर्धी खोली व्यापलेली होती.
“उघड्या जागी असतें तर देवळाच्या घुमटी सारखे दिसलें असतें हे खोर्न, नाही कां हो?” मंजिरीनं डोळे विस्फारत म्हटलें.
खोर्नासाठी माती कोणती वापरतात, वरती शेण कसं सारवतात ते मानुएलनं सांगितलं. मात्र तो खोर्नाला फोर्न म्हणायचा. अपभ्रंश असावा तो. खोर्नच्या विस्तवासाठीं कोणतेही लाकुड चालत नाही. विशिष्ट झाडाचंच लागतं. खोर्नच्या मधोमध- जमीनी पासून चार फुटांवर छोटा दरवाजा होता व आतमध्यें, मोठी पोकळी. तीन तास पेटून लाकडाचा कोळसा झाला की मग त्या पोकळीत फॉर्माचे पाव, पोळी, कांकणा वगैरे कशी भाजतात ते त्यानं दाखवलं. पावांचे इतके प्रकार मीही कधी पाहिले नव्हते. आपण सरसकट पाव म्हणतों ते फॉर्मातले. फॉर्मात म्हणजे ट्रेत आठ पाव आसतात. शिवाय उंडे. पाव मऊ असतो तर उंडे कडक. अधिकतर गोंयकारांना उंडे आवडतात. आणखी एक प्रकारचा पाव असतो त्याला कात्रीनं चीर घातलेली असते. म्हणून त्याला कातरो असं नांव आहे. शिवाय चार कोपरे असलेला कोनशांचा पाव, अलिकडचे लोक त्याला बटरफ्लाय ब्रेड असंही म्हणतात. आणखी एक लांबट पाव असतो त्याला लोळी पाव म्हणतात. काफ्रियाल चिकन किंवा मटण-सुखा स्टफ करण्यासाठीं हा वापरतात. गुळ घालून बोल बनवतात त्याची चव तर आगळीच.
Subodh Kerkar, 2021
“तुझा धंदा चांगला चाललेला दिसतोय. तूं पुर्ण समाधानी आहेस ना?” गुरूनं विचारलं. त्यावर मानुएल उद्गारला “हो. हो. मस्त चालतो बिझिनेस. पण- ” मग तोंड पाडून मानुएल पुढं म्हणाला, “अलीकडे पोळीला चांगली मागणी आहे. पोळीला गव्हाचा कोंडा वापरतात, मैदा नव्हे. डायबेटीस किंवा डायट सांभाळणाऱ्यांना पोळीच हवी. कांकणांचा डिमांड मात्र कमी कमी होतोय. पूर्वी आजारी माणसाला कांकण खायला द्यायचे. ताप आला वा टायफॉईड झाला की मग शक्ती भरून येण्यासाठी द्यायचे कांकणाचा ‘काल्द’ म्हणजे सूप. पण आता लोक औषधांमागे धांवताहेत.”
“तरी तूं कांकणा भाजायचं बंद केले नाहीस ते पाहून बरं वाटलं.” गुरूनं दिलासा दिला.
“पण भविष्यांत काय होणार कुणास ठाऊक! माझे वडील खास गोडापाव (गुळाचा पाव) बनवायचे. ख्रिश्चनांकडे लग्नाचं देणं पाठवताना गोडापाव हवाच. पण आम्ही ते करायचं सोडून दिलय आतां.”
“म्हणजे आतां गोडापाव शिवाय देणं जातं?” मी विचारलं.
“नाही रे. गोडापाव शिवाय देणं अपूर्ण नाही का? पण काजारांच्या सीझनमध्यें तेवढा डिमांड. म्हणून साश्टीच्या बहुतेक पदेरांनी गोडापाव करायचं सोडून दिलय. आतां लोक म्हापसेच्या पदेरांकडून मागवून घेतात.”
गोडापाव मी ख्रिस्ती कांतारांतून (गाणी) ऐकले होते. ह्र्दयाला गुदगुल्या करणारं ते कांतार अजुनही आठवणीत आहे.
मोगा, जाले ते जांव म्हजो गोडाचो पाव
म्हाका सोडशी तरी जीव दितलो हांव.
लोकमानसांत प्रिय आसलेला गोडापाव गाण्यांत उतरला नाही तरच आश्चर्य. मानुएलचं बोलणं संपतय तो बाहेर मोटारसायकलला ‘पाटे’ लावलेला एकजण आला. “हा बघ आणखीन एक पदेर आला.” मितू म्हणाली. मानुएल दुखावलेल्या स्वरात म्हणाला, “बाय, तो पदेर नव्हे. तो पाव विकणारा. भट्टी चालवतो तो पदेर.”
“आतां हा मोटारसायकल वरून पाव विकणार?” गुरूनं आश्चर्यानं विचारलं.
“होय. कांहीजण मोटार घेऊन पण येतात. ते हॉटेलसाठी नेतात. गांवातून पाव विकायला फिरतात ते सायकलवरून. दुकानांत किंवा हॉटेलाना विकतात ते मोटारसायकल वरून. आणि स्टार हॉटेलना सप्लाय करणारे मात्र मोटारी घेऊन फिरतात.”
“रात्री पाव उरलेच तर त्याचं काय करतात?” ह्या माझ्या मेहुण्याच्या प्रश्नालाही मानुएलकडे उत्तर तयार होतं. “कांही वाया जात नाही. पाव उरले तर त्याचे स्लाइस करून टोस्ट करतात. त्यालाही हमखास गिऱ्हाईक असतं.”
पांच वाजून गेले होते. दिवसभराचं काम संपवलेले मजुर परतीच्या वाटेवर पाव घ्यायला येऊ लागले. त्यांच्यात बिगर गोमंतकीय मजुर अधिक होते. मी म्हणालो, “गोंयकारासारखे ह्यांना पण पाव आवडू लागले की काय?”
“मुळीच नाही. लक्षांत ठेव, गोंयकार उंडे खातात ते आवडीने, आपलं अन्न म्हणून खातात. हे कामगार लोक पाव स्वस्त मिळतात आणि कामाचा वेळ वाचतो म्हणून खातात.” मानुएलनं कामांत व्यग्र असतनाच एक सत्य सांगून टाकलं.
गिऱ्हाईकांची गर्दी वाढली तसे आम्ही मानुएलचे आभार मानून निरोप घेतला. जायच्या आधी गुळ, खोबरं घालून भाजलेल्या पोळी आणि मुलींचा आग्रह म्हणून चार कांकणा घेउनच बाहेर पडलो.
संद्याकाळी गप्पांच्या ओघात गुरूनं पुन्हा त्या विषयाला हात घातला.” आशिया खंडातला पहिला पाव माजोर्ड्यात तयार झाला असं तूं म्हणालास पण त्याची सुरवात युरोपमध्ये कुठे आणि केव्हांशी झाली असवी?”
“बायबल मध्ये म्हटलय – आदम आणि ईव्ह ह्यांना म्हणे देवानं फर्मावलं होतं, ‘कष्ट करा आणि रोजी रोटी कमवा.’ ब्रेडचा तो पहिला उल्लेख असं मानतात. पण सांगू कां? गोव्यात आमच्याकडे भाकऱ्या, भारतात रोटी-चपाती किंवा अरब देशांत खब्बुस हा सुद्धां त्या त्या लोकांचा ब्रेडच नव्हे का?”
“आणि चर्च मधे प्रार्थनेच्या नंतर लोकांच्या जिभेवर ब्रेड ठेवतात ना? तो कुठले पदेर तयार करतात?” गुरूनं शंका विचारली.
“पदेर नाही बनवत. चर्चमधे त्यांच्या प्रार्थनेनंतर भाविकांच्या जिभेवर येशुचं फ्लेश म्हणून ठेवतात तो ब्रेड पवित्र असल्या कारणनें चर्च मधेच बनवतात. सूर, यिस्ट किंवा मैदा न वापरता गव्हाच्या पिठाच्या पातळ चकत्या करतात त्यांना ‘पार्तिकुलां’ असं म्हणतात.” मंजिरीच्या डोळ्यातली जिज्ञासा पाहून मीच पुढं म्हणालो, “बरं का मंजिरी, जेझुनं उंडो मोडून शिष्यांना खाववला याची आठवण म्हणून भाविकांना ब्रेड प्रसाद म्हणून खाववायची चर्चमधे प्रथा आहे. गोव्यांत त्याला ‘पार्तिकुलां’ असं म्हणतात.”
रात्रीची जेवणं उरकताच मुली माझ्या मागं लागल्या ‘गोष्ट सांगा.’
“कोणती सांगू?”
मंजिरी म्हणाली, “मला जेझूची कहाणी ऐकायचीय – ब्रेड मोडून शिष्यांना खाववला ती.”
तेवढ्यात शीला लगबगीन आली. “ऐकलस का? तुझा जुना कोट, कपडे आणि आपण काश्मिरला गेलो होतो तेव्हाचे स्वेटर, जुने टॉवेल त्या जुन्या ट्रंकेत कोंबून आपण बाहेर ठेवले होते, आठवतय ना, भंगारवाल्याला द्यावं म्हणून? ती ट्रंक रात्री चोरीला गेलेली दिसते.”
“कुणाला तरी देऊन टाकायची म्हणूनच बाहेर ठेवली होती ना? जाऊ दे. सुलच्या पदेरान खावं.” मी म्हणालो. आणि लगेचच मला ल्युसिओ रोद्रीगीश ह्यांनी लिहिलेली लोककथा आठवली. “मंजिरी, जेझूची ती गोष्ट तुला कुठल्याही पुस्तकात वाचायला मिळेल. मी आता तुम्हाला सूलच्या पदेराची गोष्ट सांगतो. ओके?”
“सूल म्हणजे काय?” विचारलं गुरूनं, पण प्रश्न सगळ्यांनाच पडला होता.
“पोर्तुगीज भाषेतील शब्द तो. सूल म्हणजे साउथ- दक्षिण. कारवार, मंगळूर, कोची हे प्रदेश गोव्याच्या दक्षिणेला. ह्या घराच्या कौलांकडे पहा ह्याला सूलचे नळे म्हणतात. कारण ते मंगळूरहून यायचे. समजलं ना? आता गोष्ट, मध्ये बोलायचं नाही हं!”
सगळी मंडळी सावरून बसली.
खूप वर्षांमागील गोष्ट आहे. गोव्यात एक छोटा व्यापारी होता. तो खूप कंजुष होता. त्याचं एक मिठागर होतं. सूलला मिठाला चांगला भाव मिळतो म्हणून तो नौका भरून मीठ मंगळूरला पाठवायचा. खूप नफा व्हायचा. पण तो कंजुष असल्यामुळे पैसे खर्च करत नसे. त्याला मुलबाळ नव्हतं. बायको होती साधीभोळी. तो काय करायचा, कमावलेल्या पैशांतील अगदी थोडे खर्चाला ठेवून उरलेल्या पैशातून सोन्याच्या मोहरा घ्यायचा. त्याच्याकडे एक बरणी होती. सोन्याच्या मोहरा त्या बरणीत घालून घट्ट झांकून ठेवायचा. अधूनमधून दार लावून बरणी उघडून मोहरा मोजायचा आणि खुष व्हायचा. करता करता एक दिवस बरणी पूर्ण भरली. आता त्याला काळजीनं ग्रासलं. कुणाला समजलं तर ते चोरून नेतील ह्या भितीनं तो त्रस्त झाला. एक दिवस तर त्याला स्वप्न पडलं, चोर येऊन बरणी उघडून रिकामी करून पळून गेलाय. तो घाबरून जागा झाला. उठून बरणी उघडून पाहिली तर सगळ्या मोहरा जागच्याजागीं. त्याने निःश्वास टाकला. पण आतां तो रात्रंदिवस चिंता करत बसूं लागला. आपली बायको भोळी असल्यामुळे तिला कुणी ठकविल म्हणून तो घरांतच राहूं लागला. काळजीपोटीं त्याच्या मनावरील ताण वाढला. रात्र रात्र झोप येईना. भूक लागेना, अन्न गोड लागेना. कशांत मन रमेना. धट्टाकट्टा माणूस दिवसेंदिवस खंगत गेला तेव्हा बायको घाबरली. डॉक्टरला बोलावलं. त्याने तपासून विचारले, ‘त्याला कसली चिंता आहे? कुणाचे कर्ज डोक्यावर आहे काय?’ तो गप्प राहिला. डॉक्टरनं बायकोला सांगितलं, ‘त्याच्या डॉक्यावरील ताण गेल्याशिवाय तो बरा होणार नाहीं.’ मग त्या कंजुष माणसाने शहाणपणाचा विचार केला, जीवावर बेतण्यापेक्षां ती बरणी गेली तरी चालेल. त्याने बरणीची आशा सोडली. पण तिचं करायचं काय? कधीही दानधर्म न केल्यामुळे अशीच देऊन टाकायला मन तयार होईना. त्याला एक कल्पना सुचली. त्याने त्या बरणीचं तोंड घट्ट बंद केलं. ती बरणी मिठाच्या एका पोत्यांत भरली आणि ‘कोणाच्या नशिबीं असेल त्याला मिळूं दे’ असं म्हणून इतर मिठाच्या पोत्यांबरोबर हें पोतं पण नौकेवर चढवलं. काही दिवसांनी ती नौका मंगळुरच्या बंदरांत पोचली. तिथे मूळ गोव्याचे लोक खुप होते. त्यांना गोव्याचे मीठ खुप आवडयचें. त्यामुळे फार घासाघीस न होतां मीठ हातोहात संपायचें. बरणी असलेलं पोतं तिथल्या एका पदेराला मिळालं. उघडून पहातो तर आंतमध्ये बरणी आणि बरणींत सोन्याच्या मोहरा. जन्मांत कधी इतक्या मोहरा त्याने पाहिल्या नव्हत्या. खुष झाला. कुणाची तरी बरणी चुकून आपल्याकडे आली असावी व मागून कुणी शोधायला येईल असा विचार करून त्याने काही दिवस वाट पाहिली. मग त्याला आशा झाली. पुन्हा पुन्हा मोहरा मोजून पाहिल्या. नशिबात आहेत म्हणून तर आपल्याकडे आल्यात… पण कुणाच्या तरी मालकीचं धन तें, त्यावर आपला हक्क नाही… त्याचे मन त्याला खाऊं लागलें. मग त्याने एक मधली वाट शोधून काढली. मोहरांचे दोन भाग केले. आंत अर्ध्या मोहरा भरून, सगळं कौशल्य पणाला लावून एक अतिशय सुंदर केक बनवला. आणि तो त्या नौकेच्या कोपिताला भेट म्हणून पाठवून दिला. तो अप्रतिम केक त्या कोपिताला इतका आवडला कि खाण्यापेक्षां त्याने तो आपल्या केबीनमध्यें शोकेसमध्ये ठेवला व आल्यागेलेल्यांना तो मोठ्या प्रौढीने दाखवूं लागला. पुढील काही आठवडे ती नौका गोवा-मंगळुर फेऱ्या करत राहिली. एक दिवस कोपिताने केकला बुरशी आलेली पाहिली. समुद्रांत फेकून द्यायचं त्याच्या मनांत आलं, पण त्यापेक्षां कुणा गरिबाला तो देऊन टाकूं असा विचार केला. मंगळूरच्या बंदरांत त्याला एक गरीब कोळी दिसला त्याला तो देऊन टाकला. कोळ्याने विचार केला, केक सुंदर आहे तो खाऊन संपवण्यापेक्षां विकून टाकला तर थोडे पैसे तरी मिळतील. गिऱ्हाईकाच्या शोधांत तो त्याच पदेराकडे पोचला. पदेराला आश्चर्य वाटलें. आंतमध्ये नेऊन केक कापून पाहिलं तर मोहरा सुखरुप. कोळ्याच्या हातावर सोन्याची एक मोहोर ठेवतांच कोळी खुष झाला. आणि मोहरा दैवाने आपल्यासाठीच पाठवल्या आहेत ह्याची त्या पदेराला खात्री झाली. मग त्या मोहरा सुरक्षित जागी ठवून उरलेलं आयुष्य पदेराने सुखांत घालवलें. गोष्ट संपली.
“तेव्हापासून ही म्हण जन्माला आली- ‘सूलच्या पदेरान खावं’. म्हणजे सूलच्या पद्रेराच्या नशिबांत होती त्याला भोगूं दे.” गोष्ट ऐकून सगळीं झोपी गेलीं.
सकाळीं उठल्या बरोबर मंजिरीने आपला निर्णय सुनावला– “मी खुप शिकणर व पुढें पदेर होणार.”
Subodh Kerkar, 2021