आता जेव्हा मी वयाची सत्तरी गाठली आहे, तेव्हा माझ्या मनात अन्नाबद्दलचा आदर अतिशय वाढला आहे. अन्न कधी खायचं, कसं खायचं, किती खायचं आणि काय खायचं याचं भान मला आहे. इतकंच नाही तर एखादं अन्न खाल्ल्यावर ते किती काळ अजीर्ण राहू शकतं आणि माझ्या पोटावर त्याचा बरा वाईट परिणाम किती काळ राहणार आहे हेही मला समजतं. दुसऱ्या शब्दांत खाताना मी समजूतदारपणा आणि कर्मठपणा दाखवते की अविचार आणि बेछूटपणा हे माझ्या शरीराला समजतं. चमचाभर आईसक्रीमचा आनंद देखील अंगाशी येऊ शकतो. त्यामुळे स्वास्थ्य समतोल बिघडायला फार काही करावं लागत नाही याची जाणीव माझ्या शरीराला आहे.
मला आठवतं, आम्ही लहान असताना पानात वाढलेलं टाकायचं नाही अशी पद्धत होती. त्याला पवित्र मानलं जायचं. माझे बाबा सैन्यात होते त्यामुळे आम्ही सैन्यात वाढलो, तरीही आमची राहणी साधी असायची. माझे बाबा खडकवासल्याच्या राष्ट्रीय सुरक्षा दलात सेनापती (कमांडन्ट) होते. एकदा ते दुपारी घरी जेवायला आले आणि त्यांना दिसलं की मी ताटातल्या भेंडीच्या भाजीकडे नुसतीच बघत बसले आहे. माझ्या आईनं त्यांना सांगितलं की ही काही भाजी संपवत नाहीये. ते जेवायला बसले आणि इकडच्या तिकडच्या गप्पा मारत राहिले. त्यांचं जेवण झालं आणि ते हात धुवून पुन्हा माझ्यापाशी येऊन बसले आणि म्हणाले, ‘ ठीक आहे. तुझं संपेपर्यंत मी तुझ्यासोबत थांबतो. आपण गप्पा मारू’.
मला सहानुभूतीची गरज होती. माझी आई जेवून उठली होती. सगळे तिथून गेले होते. अगदी माझी प्रेमळ सांभाळकर्ती कौशल्या, जी माझं जेवण संपवायला तयार होती, तीही गेली होती. मी रडायला लागले. त्यांना हसू आलं. मी हट्टी होते. ते प्रेमळ. ते तिथेच थांबले. त्यांच्यासाठी गाडी आणि ड्रायव्हर ताटकळत होते. पण ते ड्रायव्हरला म्हणाले, ‘ लीला भिंडी खा लेगी, फिर हम चलेंगे.’
एव्हाना एन.डी.एतल्या प्रत्येकाला मी भेंडीची भाजी खालेल्ली नाही हे समजलं असणार असं मला वाटलं. पण मी लवकरच खाल्ली. खरं तर फार अवघडही नव्हतं. चारच तुकडे होते. त्याबद्दल भारतातल्या दारिद्र्याविषयी कोणतही प्रवचन नव्हतं किंवा नैतिक शिकवण मिळाली नव्हती तर संवेदनशीलता होती- अन्नाचं महत्त्व समजू न शकण्याच्या माझ्या नदानपणाविषयी आणि अन्नाबद्दल असलेल्या रीतीभातीविषयी. तरीही मिळायचा तो धडा मला मिळाला होता. ‘मी किती छान गोष्ट केली’ असं कौतुक करत ते निघून गेले.
Leela with her father
आमच्या घरात अन्न म्हणजे अनेक पिढ्यांच्या प्रभावांचं एक सुखद मिश्रण होतं. माझ्या आईचे वडील म्हणजे माझे आजोबा पश्चिम बंगालच्या वर्धमान जिल्ह्यातल्या असानोल गावात रेल्वेत कामाला होते. तिथे त्यांचं अनेक वर्षं पोस्टिंग होतं. माझ्या आजीनं स्वत:च्या सहा आणि तिच्याकडे येणाऱ्या जाणाऱ्या नातेवाईकांच्या अनेक मुलांची देखभाल केली. ती जे अन्न बनवायची ते बंगाली आणि अँग्लो इंडियन अशा दोन्ही पद्धतीचं असायचं ज्यावर रेल्वेतल्या आणि तिथल्या प्रादेशिक जीवनशैलीचा प्रभाव होता. सूप आणि शिजवलेल्या पाककृतींची जुगलबंदी गरमागरम रस्से आणि भाताशी असायची. मटन कूर्मा, विंडालू, फिश मोईली हे पदार्थ भाताबरोबरच खाल्ले जायचे तर सूप, कटलेट आणि स्टयू हे ब्रेडबरोबर. माझी आजी स्वयंपाकातली सुगरण होती. शिवाय ख्रिश्चन असल्यामुळे ईस्टर आणि क्रिसमसचे पदार्थ असायचेच, जे बनवण्यात घरातला प्रत्येक सदस्य एक तर मदत तरी करत असे, चव घेत असे किंवा केलेलं पळवत असे. यामुळेच त्या दिवसाला एक महत्त्व प्राप्त व्हायचं.
कलकत्ता, बॉम्बे किंवा दिल्लीतल्या खास दुकानांतून काजू बदाम, संत्र्याची सालं आणि विविध सुकामेवा केकसाठी आलेला असायचा. याशिवाय खारट आणि गोड कुलकुल, फळांच्या रंगांच्या आणि आकाराच्या गोळ्या, टार्ट आणि मार्झीपॅन यांनी डबे भरलेले असायचे. माझी आई आणि तिची भावंडं आपल्या आईच्या पाठीमागे जुन्या स्वयंपाकघरात जायचे जिथे ती काहीतरी खात असलेली दिसयाची. ‘ तू काय खातेयस आई?’ असं विचारल्यावर ती वैतागून काय खातेय ते दाखवायची. ते असायचे वाळवलेल्या तांदळाचे दाणे!
१९४६ मध्ये लष्करात लग्न करून आल्यावर लवकरच माझी आई तुटपुंज्या मिळकतीतही खाण्यापिण्यात आधुनिकता आणायला शिकली. माझे वडील नौदलात लेफ्टनंट होते. ते दिल्लीत राहिले. लष्करातल्या इतर बायका आपल्या पाककृती आणि त्यांना बनवण्याच्या पद्धती, कुटुंबातली गुपितं सांगायच्या आणि आपल्या नवऱ्याच्या लहानशा पगारात निटनेटकं कसं राहायचं हे सांगायच्या. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यावर छोटं नौदल मोठं झालं. जसे या बायकांचे नवरे बढती होऊन उच्च पदांवर गेले, तशा त्यांच्या बायकाही अधिक कुशल बनल्या. माझी आई साधी होती. पण तिनं आपलं घर स्नेहपूर्ण आणि आगत्यशील ठेवलं. युद्ध संपल्यावर लगेचच तिचं आणि बाबांचं पोस्टिंग लंडनमध्ये झालं. तेव्हा ती फक्त एकवीस वर्षांची होती. पण तेव्हाही तिनं एका रुग्णालयात स्वेच्छेने काम केलं. इंग्लंड, पंजाब, भारत किंवा पाकिस्तान असे कुठेही गेलात तरी तिच्या पिढीतल्या तरूणांसमोर जे चित्र होतं तेच तिच्या समोरही होतं. ते म्हणजे मर्यादित शिधा(रेशन), वंचितता, बलिदान आणि सन्मान.
ती काही वर्षांनी भारतात परत आली, कदाचित तेव्हा तिला माझ्या वडिलांचे महाराष्ट्राशी असलेले घट्ट अनुबंध आणि तिची सासू बनवत असलेल्या रुचकर स्वयंपाकाची जाणीव झाली. हे अन्न म्हणजे सर्वोत्कृष्ट महाराष्ट्रीय पाककृती होत्या ज्या घरात नियमित बनवल्या जायच्या. यासोबतच उत्तम ज्युईश भारतीय पदार्थांचाही समावेश होता जे अनेक दिवस पाळल्या जाणाऱ्या शुभ दिवसांमध्ये बनवले जायचे. आईला हे सगळं नवीन होतं. तिची लहान वाहिनी मेरी, जी देखील लग्न करून नौदलातल्या कुटुंबात आली होती, तिनं ‘ममा’ म्हणजे माझ्या आजीच्या बेने इज्राईली महाराष्ट्रीयन घरात आणि पर्यायाने तिच्या मनात स्थान मिळवायला माझ्या आईला मदत केली असावी. माझ्या आजीला तिची मुलं आणि नातवंडं ‘ममा’ म्हणत असत. ती इतर महाराष्ट्रीय बायकांसारखीच जमिनीवर पण चौकीवर( छोटा पाट) बसून, अंगिठीवर स्वयंपाक करायची. माझ्या स्मृतीत कायम राहिलेली एक आठवण म्हणजे तिच्या स्वयंपाकघरातून निघणाऱ्या पुलावाचा आणि हिरव्या मसाल्यातल्या पोंपफ्रेट रश्श्याचा सुगंध. ती खाली बसून मोठ्या, पातळ पोळ्या करायची आणि घरी आइसक्रीम बनवायच्या मशीनचं चाक फिरवायला तिला तिच्या विश्वासू कामवाल्या बाईची मदत मिळायची, ज्यामुळे आम्हा पंचवीस चुलत भावंडांना आईस्क्रीम खाता यायचं.
माझ्या आईबरोबर क्रॉफर्ड मार्केटमध्ये जाऊन लोणच्यासाठी आणि गोड चटणीसाठी, कैऱ्यांच्या फोडी करून आणणं म्हणजे एक सहल असायची. माझी आई कैरीवाल्याबरोबर तासंतास गप्पा मारत बसायची. १९५८ मध्ये आम्ही जेव्हा पुण्यातल्या खडकवासलात राहायला आलो तेव्हा सीझनचे पहिले छोटे, गरगरीत, रसाळ, रेषा असलेले चूसा आंबे (गोटी आंबे) आले. माझी आई आम्हा सगळ्या लहान मुलांचे कपडे काढून, फक्त चड्डीवर बसवायची. लहान मुलांच्या अंघोळीच्या टबात आंबे आणि पाणी भरून, त्यांना उन्हात ठेवून, त्यावर यथेच्छ ताव मारायला द्यायची. म्हणून म्हणते की माझ्याकडे या आठवणी आहेत, पाककृती नाही.
Leela (extreme right) with parents & siblings
मी दहा वर्षांची झाले तेव्हा मी चेन्नईच्या बाहेरच्या भागात असलेल्या आश्रमात रहात होते. पहाटे ५ वाजता नळाच्या गार पाण्याखाली आंघोळ करणे, परकर पोलके घालून ६ वाजता भारत समाजाचे रोजचे पठण करणे, यातला सगळ्यात आवडीचा भाग म्हणजे सकाळच्या डब्याला असलेल्या पोंगळ आणि इडलीबरोबर सांबार, चटणी खाणे हे सर्व माझ्या वाढीतले ‘खाद्य’ होते. खीर आणि टोस्टविषयी सांगायचं तर विसरूनच गेले. पौष्टिक शाकाहारी अन्न आणि सर्वधर्मीय प्रार्थनांवरच माझी ‘ऊंची’ वाढली आणि मी सशक्त झाले. मी माझ्या बालपणीच्या हिरोचं – डॉ. पद्मासिनी यांचं आनंदानं अनुसरण करून भजन गायचे, कंपाऊंडमधील चिंचेच्या झाडांवर चढायलाही मला आवडायचं. फक्त मुलांनाच ही मुभा का असावी?
माझ्या फावल्या वेळेत मी भरतनाट्यमही शिकले आणि शाळेतही गेले.
पुढची सात वर्षे आणि परत आल्यावरची सात वर्षे मी त्याच दक्षिणी अन्नावर जगत होते. त्यात फळं असती तर बरं झालं असतं. माझ्यासमोर असलेल्या पर्यायांतून निवड करणं अतिशय अवघड होतं. एक पर्याय होता मी माझं खाणंपिणं आणि पेहराव माझ्या आयुष्याहून वेगळ्या अशा उच्चभ्रू, विलायती चुलत भावंडांसारखं ठेवावं किंवा मी ज्या शाळेत होते त्याप्रमाणे ठेवावं जे अनुसरायला मला अतिशय आनंद व्हायचा. मी दीर्घ काळ शाकाहारी होते आणि नंतर नव्हते, यामुळे शाकाहार की मांसाहार यातून निवड करणं ही कदाचित सर्वात अवघड गोष्ट होती. ही द्विधा माझा अनेक वर्षे पिच्छा पुरवत राहिली. त्यातून माझ्यावर एका हट्टी राशीचा प्रभाव असल्यामुळे मांसाहार सोडण्याचा निर्णय हा स्वत:चा असावा, गुरुंनी सांगितलं म्हणून नसावा असा माझा अट्टाहास होता. मी माझा अहं किती जपत होते याची कल्पना तुम्हाला आली असेलच.
Leela Samson with her guru, Rukmini Devi Arundale
परंतु मी स्वीकारलेल्या आयुष्यात, जिथे पोरीयल, सांबार, रस्सम्, कोझंबू आणि पायसम हे माझं प्रमुख अन्न होतं, त्यातून मी खूप मोठ्या प्रमाणात स्टार्च सेवन करतेय हे कधी कोणी सांगितलं नाही. हे सर्व रुचकर पदार्थ ढीगभर भाताशी खाल्ले जातात. पण एव्हाना मी पूजा, श्लोक, संकल्प आणि संप्रदाय यांचा समावेश असलेल्या एका आदर्श दक्षिण भारतीय हिंदू जीवनाचा भाग बनले होते. वर्षातून नियमित येणारे कार्यक्रम, चांद्रमासाप्रमाणे येणारे उत्सव, ज्यात दर शुक्रवारी मरुंडीश्वर मंदिरात होणारे भाजनाचे कार्यक्रम, तामिळनाडूच्या मंदिर असलेल्या ठिकाणांहून निघणाऱ्या यात्रा आणि मिरवणुका यांचा समावेश होता, यांना मीही पाळत होते. कारण हे कार्यक्रम एका नर्तकासाठीही महत्त्वाचे होते.
आपल्या पारंपरिक आहारात नर्तकाने काय टाळायला पाहिजे यावरही चर्चा झाली असती तर ते उपयोगी ठरलं असतं. पांढरा तांदूळ, पांढरा मैदा, पांढरी कणिक, पांढरी साखर आणि पांढरे मीठ हेच तर शत्रू आहेत. तेव्हापासून अनेक वर्षे मी सेमियान, दलिया, रवा, पोहा, अनेक प्रकारच्या बाजरी, कमी रिफाइंड कणिक आणि बहु-धान्य ब्रेड, काही नाही तर स्वादिष्ट आंबट-कणीक असे अनेक पर्याय, आपण खात असलेल्या मुख्य तांदळाला पर्याय म्हणून स्वीकारले आहे. नर्तक आपल्याच परंपरेतील अधिक सशक्त पर्यायांचा विचार करू शकतात. आपण काहीच पिढ्या मागे गेलो आणि आज अवलंबलेल्या जीवनशैलीच्या दोन पावलं मागे आलो तर आपल्याला पूर्णाहाराचं रहस्य समजू शकेल. मोड आलेली धान्यं किंवा सुकामेवा आणि शेंगदाणे यावर दहयाचे ड्रेसिंग, कमी शिजवलेल्या भाज्या आणि फळांची डिश कोशिंबीरीची जागा घेऊ शकतात. यासोबत क्विनोआसारखे महाग, परंतु नवीन पर्याय आहारात बदल आणू शकतात आणि जेवण आकर्षक बनवू शकतात.
Leela Samson during a recital
वैद्यकीय अभ्यास करून सर्जन बनण्याची माझी बालपणीची महत्त्वाकांक्षा, जीवशास्त्र हा विषय अभ्यासक्रमातच तत्वत: नसल्यानं तात्काळ बाजूला राहिली. वयाच्या सोळाव्या वर्षी मी कलाक्षेत्र सोडण्याच्या उंबरठ्यावर होते आणि मी एक नर्तकी बनणार होते, तेव्हा मला हे समजू लागलं की एका तंदुरुस्त शरीराला केवळ चांगल्या जुनुकांचे आभार मानून किंवा मैदानी खेळाची मुळात आवड असल्यामुळे तंदुरुस्त बनता येत नाही, तर त्यासाठी कष्ट घ्यावे लागतात. वर्षानुवर्षं मेहनत घ्यावी लागते. सडपातळ दिसण्यासाठी सोपं काही नाही. त्यासाठी एकतर भारतीय स्वादिष्ट पदार्थ खाणं थांबवा किंवा व्यायाम करा. पहिला उपाय हा पर्याय नव्हता. मी वृषभ राशीची आहे आणि मला अन्न आवडतं. सुरुवातीला माझे आईवडील राहायचे त्या मुंबईपासून जिथे माझी शाळा होती त्या मद्रासपर्यंत, वयाच्या नवव्या वर्षापासून मी रेल्वेने जा ये सुरू केली. नंतर कार्यक्रमांसाठी केली ज्यात फार कमी मानधन मिळालं आणि रेकॉर्डिंगचा पर्याय तेव्हा उपलब्ध नव्हता. त्याकाळात मी रेल्वेतून देश पालथा घातला. लखनऊमध्ये पानावरची पुरी आलू, आग्र्यातला अंगुरी किंवा केसर पेठा, कुठेही आणि कधीही मिळणारा कुल्हडमधला चहा, विशेषत: केरळच्या पालघाट स्टेशनवर किंवा मध्यप्रदेशच्या भोपाळमध्ये कुकुडत्या थंडीत, पहाटे ५ वाजता मिळणारा! दक्षिणेत मिळणारा गरमागरम इडली डोसा आणि उत्तरेत मिळणारे स्टफ पराठा आणि दही. देशाच्या प्रत्येक राज्यांची खासियत असलेले हे पदार्थ मी त्या त्या राज्यांच्या प्लॅटफॉर्मवर चाखले. माझ्या स्मृतीत राहिलेलं सगळ्यात अविस्मरणीय दृश्य म्हणजे रेल्वेच्या डब्यात सगळे झोपलेले असतानाची स्तब्धता, हवेतला गारवा आणि वाफाळता चहा.
१९७५ मध्ये मी दिल्लीत स्थायिक झाल्यावर सुजन सिंग पार्कमध्ये भाडेकरू होते, त्यामुळे मला बाहेर खावं लागायचं. स्वतंत्र राहायच्या हट्टापायी तुम्ही जे करता ते मी केलं. मला ते फार आवडलं असं नाही. पण जेव्हा मला कामिनी प्रेक्षागृहासमोरच्या भारतीय कला केंद्रात राहायला जागा मिळाली तेव्हा मी माझी पाहिलीवहिली भांडी आणली. तेव्हाच मी भूषण लखंदरी, ज्यांच्या स्वयंपाकघराची खिडकी माझ्या स्वयंपाकघराच्या खिडकीसमोर होती, त्यांच्याकडून स्वयंपाकाचे पहिले धडे घेतले. ते मला ओरडून सांगायचे ‘ अच्छा दीदी, तेल मे अब जिरा डालीये. फिर चावल, दाल और वेजीज जो भी है. पानी डालीये, प्रेशरकुकर बंद करिये. खोलके बस घी डालके खाइये. मजा आ जायेगा’ . किमान आता घर होतं आणि मी जे काही बनवत होते ते माझ्या स्वत:च्या अकुशल का असेना, हातांनी बनवत होते. त्रीनदाद, रीयुनियन, ढाका, आणि अगदी चायना इथून आलेल्या विद्यार्थ्यांना कँटिनच्या राजमा चावलपेक्षा मी बनवलेल्या स्वयंपाकाचं कौतुक वाटायचं. पण ते काहीच नव्हतं हे समजायला मला जरा वेळ लागला.
Leela with young disciples
कमला आणि मितू, विद्यालय, अदिती आणि जया, माला आणि जुगनू, सुंदरम परिवार, पौर्णिमा आणि माधवी, विनय हे माझे मित्रमैत्रीण फारच छान होते जे एकतर अप्रतिम स्वयंपाक करायचे किंवा अप्रतिम जेवायला घालायचे. यांच्यासोबत अतिशय रुचकर आणि स्वादिष्ट जेवणावर, नव्या जुन्या लोकांबरोबर, हसत खिदळत मारलेल्या गप्पा, अविस्मरणीय आहेत. मला याहून आनंदी काळ आठवत नाही. पण आणीबाणीसारखे दु:खी दिवसही होते. आमच्या सिख बांधवांसोबत आम्ही काहीजण, प्रार्थना करायला गोल्डखान्याजवळच्या गुरुद्वाऱ्यातही गेलो होतो, पण नंतर मिळणाऱ्या चविष्ट प्रसादासाठीही गेलो होतो. भारतीय कला केंद्र, त्रिवेणी, कथ्थक केंद्र आणि राष्ट्रीय नाट्य विद्यालय इथून आलेले नर्तक, संगीतकार आणि अभिनेते, चित्रकार, पॉटर आणि शिल्पकार जे मंडी हाऊसमध्ये किंवा त्याच्या आसपास राहिलेले आहेत त्यांना हे महित आहे की बंगाली मार्केटच्या पान, ड्रग आणि रम या वरकरणी प्रसिद्ध गोष्टींच्याशिवाय तिथलं चाट देखील प्रसिद्ध आहे. त्या तीस वर्षांमध्ये मी पक्की ‘चाटखाऊ’ बनले. गोल गप्पे, दही पापडी, छोले भटुरे, कचोरी, टिक्का आणि लस्सी हे अनेकदा माझं संध्याकाळचं जेवण असायचं. हे असताना स्वयंपाक करायची गरजच नव्हती!
एक कलाकार म्हणून आजच्या काळात प्रवास करताना, तुमच्या विचारपूर्वक घडवलेल्या जीवनशैलीवर परिणाम होत असतो आणि तो चांगला नसतो. हॉटेलचं जेवण तुमच्यासाठी चांगलं नसतं. का माहीत नाही, पण नसतं. तुम्ही मोठं मानधन मिळवणारे कलाकार असाल किंवा किरकोळ मानधन मिळणारे नवीन कलाकार, तुम्हाला पंचतारांकित हॉटेलमध्ये राहायला मिळालं असेल किंवा गल्लीबोळातल्या साधारण हॉटेलमध्ये, तरी घरच्या वरण भाताची सर कशालाच येणार नाही. त्यातून तुमचं वय जसजसं वाढत जातं या गोष्टी अजूनच अवघड होतात. परदेशी जातानाही हाच अनुभव येतो. हवाई सेविका तिच्या बाजूने सांबार-सादम, पुलिओ सादम, थाईर सादम आणि चिप्स देऊन माझ्यासाठी गोष्टी सुकर करायचा प्रयत्न करते. पण त्यात कोणत्याही भाज्या नसतात.
Working in her kitchen
Photo credit – Aarathi Ganesan
कार्यक्रमाच्या आधी मला साधं, बिनतेलकट, बिनतिखटाचं जेवण करायला आवडतं. कार्यक्रमानंतर मी फक्त सूपच घेऊ शकते. कार्यक्रमानंतर निराळ्या भावनेनंच पोट भरलेलं असतं त्यामुळे अन्नाला जागाच नसते. गांधीजींनी म्हटलंय की माणसाला धडधाकट राहायला फक्त एक मूठ अन्न लागतं. जर आपण आपल्या शरीराचं म्हणणं ऐकलं तर आपल्याला काय ऐकू येईल ‘ हे अन्न तुम्हाला अस्वस्थ करेल तर हे समाधान देईल. इतकंच पुरे, आता उरलेला सगळा हव्यास आहे.’
Photo credit – Aarathi Ganesan